इंडिगोच्या मक्तेदारीमुळेच प्रवाशांना प्रचंड त्रास, मंत्र्यांनी जाहीर माफी मागावी.वर्षा गायकवाड

Share

एसएमएस -प्रतिनिधी -मिलन शहा

मुंबई : सर्वसामान्य माणसांनाही हवाई प्रवास सुलभ करण्याचे नरेंद्र मोदींनी दाखवलेले स्वप्न हे केवळ दिवास्वप्नच राहिले असून हवाई प्रवास हा शोषण व लुटीचे साधन बनला आहे. मागील सहा सात दिवसात इंडिगोने जो गोंधळ घातला त्यामुळे हजारो प्रवाशांना प्रचंड मानसिक, शारिरिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला. यावेळी कोणीही प्रवाशांशी संवाद साधला नाही. या गोंधळामुळे भारताची जगात नाच्चकी झाली, हे सर्व एकाच विमान कंपनीच्या मक्तेदारीमुळे झाले असून झालेल्या प्रकाराबद्दल सरकार व विमान वाहतूक मंत्री यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.

लोकसभेत बोलताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, देशात आधी किंग फिशर, जेट एअरवेज, गो फर्स्ट, एअर डेक्कन, जेटलाईट, एअर सहारा, एअर एशिया इंडिया कंपन्या हवाई क्षेत्रात सेवा देत होत्या पण सरकारकडे ठोस धोरण नसल्याने यातील एक एक कपनी बंद होत जवळपास 20 विमान वाहतूक कंपन्या बंद पडल्या. आता फक्त एअर इंडिया, विस्तारा, इंडिगो अशा काही मोजक्या कंपन्यांच कार्यरत आहेत पण यातील सर्वात मोठा हिस्सा हा इंडिगो या एकाच कंपनीकडे आहे आणि या कंपनीच्या मक्तेदारीमुळे परवाचा गोंधळ झाला. मक्तेदारी असल्याने ग्राहकांचे शोषण व लुट सुरु आहे. 5 ते 6 हजार रुपयांचे तिकिट 20 ते 30 हजार रुपये झाले. विमानतळावर लोकांना पाणीसुद्धा मिळाले नाही. अडकलेल्या प्रवाशांशी कोणीही संवाद साधला नाही. आता नवी मुंबई विमान तळावरून इंडिगो कंपनीला परवानगी दिली आहे. पण नुकताच झालेला बट्ट्याबोळ पाहता सरकारकडे प्लॅन बी आहे का. असा प्रश्न खासदार वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केला आहे.

मुंबई विमानतळावर अदानीकडून लुट..
मुंबई विमानतळावर प्रवाशांकडून UDF, ASF व इंधन सरचार्ज च्या नावाखाली मोठी लुट केली जात आहे. पाण्याची बाटली, समोसा घेतला तरी त्याची किंमत प्रचंड जास्त आहे. पार्किंग चार्जेस एका तासाला 370, दोन तासाला 400 रुपये तर सहा तासाला एक हजार रुपये आकारले जाते. मुंबई विमानतळावरील दुकानदारांकडून अदानी कंपनी भरमसाठ भाडे आकारते व विक्रीतूनही मोठा हिस्सा वसूल करते, अशी दुहेरी लुट सुरु आहे. विमानतळावर जागोजागी दुकाने थाटली आहेत, प्रवाशांना चालायला जागाही नाही. अदानी कंपनीचा तोटा भरून काढण्यासाठी आता आंतरराष्ट्रीय प्रवाशांकडून 175 रुपय़े असलेला UDF शुल्क 3856 रुपये करण्य़ाचा प्रस्ताव दिला आहे, त्याला रोखण्याचा सरकार प्रयत्न करताना दिसत नाही. अदानी कंपनीची मनमानी सरकार का खपवून घेत आहे. मुंबईचा हवाई प्रवास महाग करण्याचा हा प्रकार आहे. यामुळे मुंबईच्या पर्यटनावर मोठा परिणाम होऊ शकतो. ही लुट पाहता एअरपोर्ट अथोरिटी ऑफ इंडियाचे नाव बदलून अदानी अँड सन्स हे नाव ठेवले पाहिजे.

मतदारसंघातील प्रश्न..
मुंबई विमानतळाचा रनवेच्या फनेल भागात 18 लाख लोक राहतात. मागील 70 वर्षांपासून हे लोक रहात आहेत, त्यात वरिष्ठ नागरिकही आहेत, फनेल भाग असल्याने या जुन्या इमारतींचा विकास करता येत नाही. ही जागा आता एका उद्योगपतीच्या घशात घालण्याचे प्रयत्न सुरु असून त्यासाठी तेथील रहिवाशांना जबरदस्तीने घरातून हाकलून दिले जात आहे, त्यांचे वीज, पाणी, घराकडे जाण्याचे रस्ते सर्व बंद करून कोंडी केली जात आहे. या भागात विमान कर्मचाऱ्यांची वसाहत आहे, सफाई कर्मचारीही राहतात. सरकार अदानीसाठी मंबईतील जागा देते त्यासाठी सर्व नियम अदानीच्या फायद्याचे बनवले जातात तर या सर्वसामान्य लोकांसाठी काही धोरण का बनवले जात नाही. केंद्र व राज्य सरकारने यातून मार्ग काढला पाहिजे. याप्रश्नी मी सातत्याने आवाज उठवत आहे. मंत्र्यांना भेटले पण अद्याप निर्णय होत नाही, सरकारने या प्रकरणात लक्ष घालून हा प्रश्न कायमचा सोडवावा असेही खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.


Share

4 thoughts on “इंडिगोच्या मक्तेदारीमुळेच प्रवाशांना प्रचंड त्रास, मंत्र्यांनी जाहीर माफी मागावी.वर्षा गायकवाड

  1. जनतेला किती हि हाल होवो हे कधी हि झोपेतून जागणार नाही जराशी चिरीमिरी खिशात घातली कि गप्प बसायचे सर्व एकच विचार शिवबा जन्म घयावा खरा पण माझ्या घरात नको बाजुचया घरात

  2. जनतेला किती हि हाल होवो हे कधी हि झोपेतून जागणार नाही जराशी चिरीमिरी खिशात घातली कि गप्प बसायचे सर्व एकच विचार शिवबा जन्म घयावा खरा पण माझ्या घरात नको

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *