
एसएमएस –प्रतिनिधी – मिलन शहा.
मिरा-भाईंदर शहराच्या सामाजिक सलोख्याच्या इतिहासात आज एक सुवर्णपान जोडले गेले आहे. ‘गोमाता’ ही राज्यमाता असताना, तिच्या सन्मानाचे रक्षण करण्यासाठी नयानगर (मिरा रोड) येथील मुस्लिम बांधवांनी (कुरेशी समाज) एकमुखी निर्णय घेत परिसरात गोमांस विक्रीवर पूर्णपणे बंदी घातली आहे. मुस्लिम समुदायाने घेतलेल्या या स्तुत्य आणि धाडसी निर्णयाचे स्वागत करण्यासाठी आज महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक यांनी आज नयानगर गाठून या निर्णयाचे तोंडभरून कौतुक केले.
नयानगर परिसरात मोठ्या संख्येने मुस्लिम समाज वास्तव्यास आहे. काही समाजकंटकांकडून गोमांस तस्करीच्या घटना घडवून या परिसराची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न सातत्याने होत होता. याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी परिसरातील वरिष्ठ मुस्लिम बांधवांनी (कुरेशी समाज) एकत्रित बैठक घेतली. या बैठकीत “नयानगर परिसरात कोणत्याही प्रकारे गोमांस विक्री होऊ देणार नाही” असा ऐतिहासिक ठराव मंजूर करण्यात आला. विशेष म्हणजे, जर कोणी हा नियम मोडला तर त्याच्यावर केवळ कायदेशीर कारवाईच नाही, तर मुस्लिम बांधव स्वतः पुढाकार घेऊन अशा प्रवृत्तींना आळा घालतील, असा कडक इशाराही समुदायाने दिला आहे.
मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून सन्मान
या कौतुकास्पद निर्णयाची दखल घेत मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज हैदरी चौक, नयानगर येथे भेट दिली. यावेळी त्यांनी मुस्लिम समाजाच्या या निर्णयाचे अभिनंदन करत त्यांना ‘गोमातेची प्रतिकृती’ भेट स्वरूप देत त्यांचा गौरव केला. मुस्लिम समुदायाने घेतलेल्या या निर्णयामुळे संपूर्ण मिरा-भाईंदर शहरात आनंदाचे वातावरण आहे. जाणीवपूर्वक केल्या जाणाऱ्या बदनामीला बगल देत, सामाजिक शांतता आणि धार्मिक पावित्र्य जपण्यासाठी मुस्लिम बांधवांनी जो आदर्श घालून दिला आहे, त्याचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.
यावेळी बोलताना मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, “मिरा-भाईंदर हे शहर ‘सर्वधर्म समभावाचे’ उत्तम उदाहरण आहे. नयानगरमधील मुस्लिम बांधवांनी घेतलेला हा निर्णय केवळ धार्मिक सलोखा वाढवणारा नसून, तो देशाच्या कायद्याचा सन्मान करणारा आहे. या निर्णयामुळे मिरा-भाईंदरमधील एकोपा अधिक घट्ट झाला आहे. जे लोक कायद्याचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर शासन स्तरावर कठोर कारवाई केली जाईल, मात्र समाजाने स्वतःहून घेतलेला हा पुढाकार खरोखरच कौतुकास्पद आहे.”
Ohh great good decision by whole Muslim community of that area