लोकसंत गाडगेबाबा पुण्यतिथी अनोख्या उपक्रमांनी साजरी

Share

एसएमएस -प्रतिनिधी -वैशाली महाडिक

मुंबई :चारकोप सह्याद्रीनगर येथील रयत शिक्षण संस्थेच्या प्रा. डॉ. एन. डी. पाटील विद्यालयामध्ये आज लोकसंत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी अत्यंत साधेपणा, स्वच्छता व सामाजिक बांधिलकी या मूल्यांना अनुसरून अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात आली. विशेष म्हणजे सन १९९२ पासून सुरू असलेली ही परंपरा आजतागायत अविरतपणे सुरू आहे, हे या विद्यालयाचे आगळे-वेगळे वैशिष्ट्य आहे.

कार्यक्रमाची सुरुवात सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी शाळा व परिसर स्वच्छता अभियानात सहभाग घेऊन केली. “स्वच्छता म्हणजेच देवपूजा” हा लोकसंत गाडगेबाबांचा संदेश कृतीतून जपत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

यानंतर झालेल्या सभेच्या कार्यक्रमात *रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य मा. श्री. प्रशांतदादा पाटील व मा.सौ. संगीता प्रशांत पाटील व स्थानिक समिती सदस्य मा.श्री.मदनराव चव्हाण यांच्या शुभहस्ते लोकसंत गाडगेबाबा व ही परंपरा विद्यालयात सुरू करणारे *कै. मुख्याध्यापक किर्तनराव गायकवाड सर* यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.

यावेळी कुमारी संस्कृती भागवत व कुमारी दुर्वा जाधव यांनी लोकसंत गाडगेबाबांच्या विचारांवर प्रभावी भाषणे केली. दुर्वा यादव हिने गाडगेबाबांच्या जीवनकार्यावर आधारित स्वरचित कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कुमारी प्राजक्ता सलगर व कुमार यश तावरे यांनी क्षेत्रभेटीतील अनुभव कथन केले. तर दुर्वा यादव, दक्ष दबडे व दक्षिता साळुंखे यांनी सादर केलेल्या गीतांनी कार्यक्रमात भक्तिभाव निर्माण केला.

प्रमुख पाहुण्या मा.सौ. संगीता पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना “माणसाने अंतर्बाह्य निर्मळ राहणे हीच खरी संतसेवा आहे,” असा मौलिक संदेश दिला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी एकत्र येऊन ‘गोपाला गोपाला, देवकीनंदन गोपाला’* या भजनाचा सामूहिक गजर केला.

सभेनंतर लोकसंत गाडगेबाबांच्या साधेपणाची आठवण करून देणारी पिठलं-भाकरची एकत्र पंगत आयोजित करण्यात आली. विद्यार्थी व शिक्षकांनी एकत्र बसून जेवणाचा आस्वाद घेत सामाजिक समतेचा आदर्श घालून दिला.

या कार्यक्रमाला माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. जरे एस. एम., प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. उमाकांत जगताप, तसेच पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक विभागातील सर्व सेवकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रबळकर सर व श्री. नादरगे सर यांनी केले.

लोकसंत गाडगेबाबांचे विचार, स्वच्छता, श्रमप्रतिष्ठा व सामाजिक समता यांचा वारसा १९९२ पासून अखंडपणे जपत असलेले हे विद्यालय आजही समाजासाठी प्रेरणादायी कार्य करत असल्याचे या उपक्रमातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले.


Share

3 thoughts on “लोकसंत गाडगेबाबा पुण्यतिथी अनोख्या उपक्रमांनी साजरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *