
एसएमएस-प्रतिनिधी-सुरेश बोर्ले
मुंबई : राष्ट्र सेवा दल,मालवणी,काचपाडा,मालाड आणि सफल संस्था विकास वेल्फेअर सोसायटी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'दिवाळी-ईद-ख्रिसमस मिलन' सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. आजच्या काळात सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी असे उपक्रम काळाची गरज असल्याचे या निमित्ताने दिसून आले. विविध धर्मातील सण जरी वेगवेगळे असतीलही पण सगळ्यांमध्ये माणुसकी टिकविणारा एकच धर्म आहे. सानेगुरुजी यांनी सांगितल्या प्रमाणे खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे.
या कार्यक्रमाची काही ठळक वैशिष्ट्ये आहेत.लहान मुलामुलींनी सर्वधर्मीय संदेशाचे वाचन केले. हिंदू धर्मीय चिमुकली अदरीजा बाबू डे हिने कलमा आणि श्लोक पठण करून कार्यक्रमाची सुरुवात केली व रमजान ईदची माहिती दिली.
फवाद मुदस्सर सय्यद याने दिवाळी सणाचे महत्त्व विशद केले.अंकिता कनोजिया हिने शीख धर्माबद्दल, तर अंजली बाबू डे हिने ‘ईद-उल-अझा’ (बकरी ईद) का साजरी केली जाते, याची माहिती दिली.इनाया शेख हिने नाताळ आणि ख्रिस्ती समाजातील सणांच्या महत्त्वाबद्दल उपस्थितांचे प्रबोधन केले.
हा कार्यक्रम सादर करताना सांस्कृतिक व सामाजिक संदेश समीर वागळे यांनी दिला.”प्रथम आपण मानव आणि भारतीय आहोत” असा मोलाचा संदेश त्यांनी यावेळी दिला.
नेत्रहीन तरुण दानिश शेख याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर सादर केलेल्या पोवाड्याने उपस्थितांची मने जिंकली.
रायन आणि अंकिता कनोजिया यांचा वाढदिवस केक कापून साजरा करत आनंद द्विगुणित करण्यात आला.

या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे कार्यकर्त्यांनी घरून बनवून आणलेले पदार्थ. सिद्धेश्वरी शर्मा (करंजी), रेखा कोटक (नारळ वडी), सोमा डे (गुलगुले) आणि ईशा व वैशाली सय्यद (शीरखुर्मा) यांनी आणलेल्या फराळाचा सर्वांनी मिळून आस्वाद घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निसार अली सय्यद यांनी केले, तर सोमा डे यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. वैशाली सय्यद यांनी पाहुण्यांचे स्वागत व उपस्थितांचे आभार मानले.
निष्कर्ष: नाताळच्या दिवशी एकत्र येत, ‘संविधानाचे पालन आणि सामाजिक एकोपा’ हाच खरा धर्म मानत मालवणीकरांनी दिवाळी, ईद आणि नाताळ एकाच छताखाली साजरा केला.

Very nice
खूपच छान सर्वधर्म समभाव
Very good