
एसएमएस -प्रतिनिधी -सोमा बाबू डे.
मुंबई : बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक १६६ आणि तक्षशिला महिला मंडळ, राठोडी यांच्या संयुक्त विद्यमाने तक्षशिला बुद्ध विहार, राठोडी, मालाड (प) येथे माता रमाई भीमराव आंबेडकर यांची १२८ वी जयंती धार्मिक व सामाजिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून बौद्धजन पंचायत समिती गट क्रमांक २९ चे गटप्रतिनिधी आयु. सुनील गमरे उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी माता रमाई आंबेडकर यांच्या त्यागमय व संघर्षपूर्ण जीवनावर सविस्तर प्रकाश टाकला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत अत्यंत खडतर परिस्थितीत संसार उभा करताना माता रमाई यांनी केलेला त्याग, सहनशीलता आणि कणखरपणा समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले. स्वतःच्या हक्कासाठी कधीही न लढता संपूर्ण आयुष्य कुटुंब व समाजासाठी अर्पण करणाऱ्या माता रमाई खऱ्या अर्थाने “त्यागमूर्ती” असल्याचे त्यांनी सांगितले.
हा संपूर्ण जयंती सोहळा शाखेचे अध्यक्ष आयु. वामन रामचंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. कार्यक्रमास उपाध्यक्ष आयु. मिलिंद कृष्णा पवार, सचिव आयु. अशोक सखाराम जाधव, उपसचिव आयु. अविनाश रामचंद्र आयरे, खजिनदार आयु. मनोहर हिराजी पवार यांच्यासह माजी अध्यक्ष, पदाधिकारी, सभासद, स्थानिक रहिवासी तसेच तक्षशिला महिला मंडळाच्या अध्यक्षा आयुष्यमती अनिता वामन पवार व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु. अविनाश रामचंद्र आयरे यांनी केले, तर अनुमोदन आयु. संतोष बबन कदम यांनी केले. जयंतीनिमित्त परिसरात भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
Very good
Abhivadan.