बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळा उभारणीला गती मिळणार?

Share

एसएमएस -प्रतिनिधी -मिलन शहा

मिरा-भाईंदर परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारणीला आता गती मिळणार आहे. सामाजिक न्याय विभागाने या प्रकल्पासाठी मिरा-भाईंदर महानगरपालिकाला ना हरकत दिली असून, लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे।
घोडबंदर येथील सर्वे क्र. 233 मधील सुमारे ३८०० चौ.मी. जागा यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडून सामाजिक न्याय विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. या ठिकाणी डॉ. आंबेडकर स्मारकासह बहुउद्देशीय इमारत उभारण्यासाठी सुमारे १३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, प्रकल्पाची अंमलबजावणी महापालिकेमार्फत सुरू आहे.
या प्रकल्पाच्या अनुषंगाने मंत्रालयात संजय शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक पार पडली. बैठकीला महापालिका आयुक्त राधा बिनोद शर्मा तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
पुतळा उभारणीसाठी सुमारे २०० चौ.मी. जागेची आवश्यकता असून, ती जागा सामाजिक न्याय विभागाच्या मालकीची असल्याने महापालिकेकडून आवश्यक ना हरकत दाखल्याची मागणी करण्यात आली होती. शासनाच्या २ मे २०१७ च्या मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक परवानग्या आणि कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
या सर्व प्रक्रियांना वेग आल्यामुळे मिरा-भाईंदरमध्ये लवकरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व पूर्णाकृती पुतळा साकार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *