मालवणीत तरुणाचा संशयास्पद मृत्यू..

Share

एसएमएस -प्रतिनिधी -सोमा डे.

मालवणी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली असून, २६ वर्षीय शुभम रामस्वरूप बगोरिया उर्फ सन्नी याचा मृतदेह भाड्याच्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. ही घटना १० मे रोजी रात्री सुमारे ८ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

मिळालेल्या माहितीनुसार, तिवारी चाळ, आजमीनगर परिसरातील घराच्या खालच्या मजल्यावर राहणाऱ्या भाडेकरूला वरून रक्त गळत असल्याचे दिसून आले. त्याने तात्काळ घरमालकाला माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दल आणि पोलिसांना पाचारण करण्यात आले. दरवाजा उघडल्यावर तरुणा चा  मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला.त्याची ओळख शुभम अशी झाली.

मृतकच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम ८ मेपासून बेपत्ता होता. त्याच दिवशी त्याच्याशी शेवटचे फोनवर बोलणे झाले होते. “तो काहीतरी सांगू इच्छित होता, मात्र त्यानंतर त्याचा फोन सतत बंद लागत होता,” असे त्यांनी सांगितले. ९ मे रोजी कुटुंबीयांनी मालवणी पोलीस ठाणे येथे बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.

शुभम हा मालवणी चिकूवाडी परिसरात राहत होता. मात्र त्याचा मृतदेह आजमीनगर तिवारी चाळीत सापडल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. स्थानिकांच्या माहितीनुसार, हे  घर सुमारे सहा महिन्यांपूर्वी एका महिलेने भाड्याने घेतले होते. मात्र पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा ती महिला फरार होती.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी फॉरेन्सिक पथकाला पाचारण करून तपास सुरू केला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पालिकेच्या डॉ. बाबासाहेब रुग्णालय कांदिवली पाठविण्यात आला असून, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, शुभम  वडिलांनी मुलाला न्याय मिळावा, अशी मागणी केली आहे. “हा खून आहे की आत्महत्या, याचा सत्य उलगडा झाला पाहिजे. तसेच ज्या महिलेच्या घरात मृतदेह आढळला ती कोण आणि ती फरार का झाली, याचाही तपास व्हावा,” अशी मागणी त्यांनी केली.

सध्या मालवणी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


Share

One thought on “मालवणीत तरुणाचा संशयास्पद मृत्यू..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *