अस्वस्थ तरुणाईच्या प्रश्नांचा वेध घेणारे पुस्तकाचे प्रकाशन २३ला

Share

गोरेगावमध्ये पुस्तक प्रकाशनासह तरुण कलावंतांची एकांकिका.

एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोरले.


मुंबई,: देशातील आणि महाराष्ट्रातील तरुणाईसमोरील शिक्षण, रोजगार, शेती, पारंपरिक व्यवसाय, बदलती कुटुंबव्यवस्था आणि ग्रामीण-शहरी स्थलांतर यांसारख्या गंभीर प्रश्नांचा वेध घेणारे महत्त्वाचे पुस्तक डॉ. य. दि. फडके प्रागतिक संशोधन केंद्राच्या वतीने प्रकाशित करण्यात येणार आहे. लेखक प्रा. नागेश शेळके यांनी गेल्या तीन वर्षांत प्रत्यक्ष मुलाखती, परिस्थितीचा अभ्यास आणि विविध क्षेत्रांतील जाणकारांशी चर्चा करून हे पुस्तक साकारले आहे.
शिक्षणाचा दर्जा, शिक्षण आणि रोजगार यांच्यातील वाढती दरी, उपलब्ध रोजगाराच्या संधींचा अभाव, शेतीसमोरील संकटे आणि पारंपरिक व्यवसायांची होत असलेली पीछेहाट यामुळे तरुणाईमध्ये अस्वस्थता वाढत आहे. ग्रामीण भागातून शहरांकडे होणारे स्थलांतर, बदलत्या सामाजिक अपेक्षा आणि विवाहसंस्थेसमोरील नवे प्रश्न यांचाही या पुस्तकात वेध घेण्यात आला आहे.
‘तरुण ही देशाची सर्वार्थाने संपत्ती आहे’ असे म्हटले जाते. मात्र, चाकोरीतील स्थिर जीवन जगणेही कठीण होत असताना तरुणांनी स्वप्ने पाहायची तरी कशी, हा मूलभूत प्रश्न या अभ्यासातून उपस्थित करण्यात आला आहे. समाजजीवनात प्रचंड ऊर्जा असतानाही तिचा योग्य वापर होत नसल्याने तरुणाईतील ही ऊर्जा भविष्यात कोणत्या दिशेने वळेल, याचा विचार पुस्तकाच्या माध्यमातून मांडण्यात आला आहे.
या पुस्तकाचे प्रकाशन रविवार, २३ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता, गोरेगाव पश्चिम येथील केशव गोरे स्मारक ट्रस्टच्या मृणालताई गोरे दालनात होणार आहे. कार्यक्रमाला अर्थविषयक जाणकार संजीव चांदोरकर तसेच तरुणांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या साम्या कोरडे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
यावेळी तरुण कलावंतांकडून विशेष एकांकिकेचे सादरीकरणही करण्यात येणार आहे. तरुणाईच्या मनातील प्रश्न, अस्वस्थता आणि अपेक्षा जाणून घेण्यासाठी नागरिकांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *