
एसएमएस -प्रतिनिधी-उत्कर्ष बोरले.
मुंबई : महाराष्ट्र राज्य शॉर्ट कोर्स जलतरण स्पर्धेत प्रबोधन गोरेगावच्या ओझोन जलतरण तलावाच्या आठ वर्षीय जलतरणपटू ऋग्वेद सचिन गाडेने पाच सुवर्ण आणि एका रौप्यपदकाची कमाई करत देदीप्यमान कामगिरी केली. नाशिक येथे नुकत्याच झालेल्या स्पर्धेत ५ ते १० वर्षे वयोगटात त्याने हा पराक्रम केला.
ऋग्वेदने १०० मीटर वैयक्तिक मेडलमध्ये सोनेरी कामगिरी करत कमाल केली. पण त्याआधी त्याने ५० मीटरच्या बटरफ्लाय, बॅकस्ट्रोक, ब्रेस्टस्ट्रोक आणि
फ्रीस्टाइल या चारही प्रकारांत सुवर्ण जिंकत चौकार ठोकला होता. फक्त त्याला ४ बाय ५० मीटरच्या फ्रीस्टाइल रिलेत सोने जिंकता आले नाही. त्याच्या याच यशाबद्दल प्रबोधन गोरेगावने त्याचा गुणगौरव सोहळा आयोजित केला आणि संस्थेचे संस्थापक सुभाष देसाई यांनी त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप मारत त्याचा सन्मान केला. याप्रसंगी प्रबोधनचे अध्यक्ष नितीन शिंदे, कार्याध्यक्ष कैलास शिंदे, प्रमुख कार्यवाहक गोविंद गावडे, खजिनदार रमेश इस्वलकर, अमीश देसाई आणि जलतरण प्रशिक्षक ॲरन डिसोझा उपस्थित होते.