
भाषा, संस्कृती आणि अस्मितेचा जागर; विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त सहभाग
एसएमएस -प्रतिनिधी -वैशाली महाडिक.
मुंबई : एस.एन.डी.टी. कला महाविद्यालय आणि एस.सी.बी. वाणिज्य व विज्ञान महिला महाविद्यालयाच्या कनिष्ठ महाविद्यालयात ‘अभिजात मराठीचा गौरव : भाषा, संस्कृती आणि अस्मिता’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. मराठी भाषेची समृद्ध परंपरा, सांस्कृतिक वारसा आणि भाषिक अस्मितेचे महत्त्व या कार्यक्रमातून अधोरेखित करण्यात आले.
एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. सुनील रामटेके प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. डॉ. अदिती सावंत यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. उपप्राचार्या प्रा. प्रज्ञा खैरमोडे आणि पर्यवेक्षिका प्रा. अर्चना मेश्राम यांचीही उपस्थिती होती.
दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. ‘वंदे मातरम्’, महाराष्ट्र राज्यगीत आणि विद्यापीठगीत सादर करण्यात आले. विद्यार्थिनींनी मराठी कवितांचे वाचन केले, तर संगीत विभागाच्या पोवाड्यातून महाराष्ट्राच्या शौर्यपरंपरेचे दर्शन घडले. मंगळागौर नृत्याने पारंपरिक लोकसंस्कृतीचा रंगतदार आविष्कार सादर केला.
प्रा. डॉ. सुनील रामटेके यांनी मराठी भाषेची समृद्ध साहित्यपरंपरा, सांस्कृतिक महत्त्व आणि भाषेच्या संवर्धनातील नव्या पिढीची भूमिका याविषयी मार्गदर्शन केले. मराठी भाषेचा अभिमान बाळगण्याबरोबरच वाचन, लेखन आणि दैनंदिन व्यवहारात तिचा वापर वाढविण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी बालभारती पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाचे सदस्य प्रा. दीपक जोगदंड यांचा इयत्ता सहावीच्या चित्रकला विषयाच्या पाठ्यपुस्तक निर्मितीतील योगदानाबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. अध्यक्षीय भाषणात प्राचार्या प्रा. डॉ. अदिती सावंत यांनी विद्यार्थिनींमध्ये भाषिक जाणीव, सांस्कृतिक अभिमान आणि सर्जनशीलता रुजविण्यासाठी अशा उपक्रमांची गरज अधोरेखित केली.
कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन कनिष्ठ महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या प्रा. शिल्पा हुमे यांनी केले. विद्यार्थिनींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळाला. मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.