आदिवासी, वंचित आणि मजुरांच्या हक्कांसाठी ४८ वर्षांचा संघर्ष; किरण माने यांच्या हस्ते सन्मान.

एसएमएस-प्रतिनिधी -वैशाली महाडिक.
मुंबई : आदिवासी, वंचित आणि मजुरांच्या हक्कांसाठी गेली ४८ वर्षे लढा देणाऱ्या पालघरच्या कष्टकरी संघटनेला बाबुराव (प. बा.) सामंत संघर्ष पुरस्कार २०२६ प्रदान करण्यात आला. केशव गोरे स्मारक ट्रस्ट आयोजित सोहळ्यात अभिनेते किरण माने यांच्या हस्ते शनिवारी हा पुरस्कार देण्यात आला. ५० हजार रुपये आणि मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असून, संघटनेला मिळालेला हा पहिलाच पुरस्कार आहे.
कष्टकरी संघटनेने आदिवासी आणि मजुरांच्या हक्कांसाठी सातत्याने संघर्ष करताना वनहक्क कायद्यांच्या निर्मिती प्रक्रियेतही योगदान दिले आहे. संघटनेचे ब्रायन लोबो, सिराज बलसारा यांच्यासह अनेक कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे किरण माने यांनी संघटनेच्या संघर्षमय कार्याचा गौरव करत या लढ्यात आपण सोबत असल्याची ग्वाही दिली. देशातील संसाधनांवर नागरिकांचा हक्क आहे. सार्वजनिक गोष्टींचे खासगीकरण झाले की लोकशाही संपते, असे ठामपणे सांगत संघर्षाला पर्याय नसल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र, हा संघर्ष एकजुटीने आणि सातत्याने करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पुरस्कारामागील भूमिका केशव गोरे स्मारक ट्रस्टचे विश्वस्त युवराज मोहिते यांनी मांडली. निवड समितीच्या अध्यक्षा नीरजा यांनी पुरस्कार निवडीची प्रक्रिया स्पष्ट केली, तर कार्यकारी विश्वस्त प्रमोद निगुडकर यांनी मनोगत व्यक्त केले. गुंजन पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
केशव गोरे स्मारक ट्रस्टसह दि शिक्षण मंडळ, गोरेगाव; अभिनव शिक्षण प्रसारक मंडळ; नागरी निवारा परिषद आणि श्री देवी अंबाबाई, गोरेगाव ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार दिला जातो. या वेळी सहभागी संस्थांचे विश्वस्त, विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि बाबुराव सामंत यांच्याशी जिव्हाळ्याचे नाते असलेले अनेक जण उपस्थित होते.