सुरक्षित व गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे अभियान राज्यभरात पोहोचावे ;पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेयांचा निर्धार

Share

प्रतिनिधी:मिलन शाह

महानगरपालिकेच्या ‘सुरक्षित शाळा प्रवेश’ उपक्रमाचा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ

मुंबई, महानगरपालिकेच्या शाळांमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची रांग लागते आहे, हे आज दिसणारे चित्र मागील 10 वर्षातील सातत्यपूर्ण प्रयत्नांचा परिपाक आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण अर्थात राईट टू क्वॉलिटी एज्युकेशन हे ध्येय नजरेसमोर ठेवून त्यासाठी जाणीवपूर्वक चांगले बदल घडविण्यात आले. त्याही पुढे जाऊन आता सुरक्षित व गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रत्येक विद्यार्थ्याला मिळाले पाहिजे आणि तो त्यांचा अधिकार आहे. त्याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि निश्चिंतपणे शाळेत येता यावे, यासाठी ‘सुरक्षित शाळा प्रवेश’ (Safe Access to Schools) या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे. हे अभियान शालेय शिक्षण विभाग आणि नगर विकास विभागाच्या माध्यमातून राज्यात सर्वदूर पोहोचले पाहिजे, अशी अपेक्षा राज्याचे पर्यावरण, पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.
महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने ‘सुरक्षित शाळा प्रवेश’ हा उपक्रम सुरु केला आहे. त्याचा शुभारंभ सह्याद्री राज्य अतिथीगृहात मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, वस्त्रोद्योग मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री अस्लम शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक 11 मे रोजी करण्यात आला. यावेळी खासदार अरविंद सावंत, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, शिक्षण समितीच्या माजी अध्यक्ष संध्या दोशी, सह आयुक्त (शिक्षण) अजीत कुंभार तसेच सर्व परिमंडळीय उप आयुक्त, सहायक आयुक्त किरण दिघावकर, शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, राजू तडवी तसेच शिक्षण खात्यातील इतर अधिकारी व विविध मान्यवर उपस्थित होते.
शिक्षणासोबत सुरक्षितता आणि गुणवत्ता यांचा मेळ साधणे आवश्यक असल्याचे नमूद करुन पालकमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, प्रत्येक शाळेच्या 500 मीटर परिघामध्ये विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे वावरता आले पाहिजे. त्यासाठी चांगले पदपथ, पथदिवे, रस्ते, बसथांबे, रस्ता ओलांडण्याची सुविधा इत्यादी सर्व आवश्यक असतात. शाळेमध्ये येणाऱया प्रत्येक विद्यार्थ्याची डेंटल, मेंटल आणि डायबिटीज अर्थात दंत, मानसिक आणि मधुमेह या 3 आरोग्य पैलूंच्या दृष्टीकोनातून काळजी घेणे अत्यावश्यक आहे. कोविड कालावधीमध्ये राज्यभरात ‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेतून केलेल्या सर्वेक्षणातून सुमारे 16 टक्के नागरिकांना रक्तशर्करा संबंधित आरोग्य समस्या असल्याची बाब समोर आली आहे. त्याचप्रमाणे दंतविकारामुळे बालकांमध्ये कुपोषणाची समस्या निर्माण होते. एवढेच नव्हे तर, मानसिक आरोग्य ठिक नसल्यास विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरित परिणाम होतो. हे लक्षात घेता, या तिनही आरोग्य मुद्यांवर विद्यार्थ्यांची काळजी देखील महानगरपालिकेच्या शाळांमधून घेतली जात आहे, त्यासाठीच सुरक्षित शाळा प्रवेश अभियान राबवित असल्याचे ठाकरे यांनी नमूद केले.

पुढे ठाकरे म्हणाले की, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होणे, निकालांचे कमी प्रमाण या बातम्या काही वर्षांपूर्वी सातत्याने प्रसारमाध्यमात दिसायच्या. आता मात्र महानगरपालिकेच्या शाळांमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची गर्दी होत असल्याचे चित्र दिसू लागले आहे. हा आमूलाग्र बदल घडविण्यासाठी प्रचंड प्रयत्न करण्यात आले आहेत. महानगरपालिकेच्या शाळांमध्ये 2011 मध्ये व्हर्च्युअल क्लासरुम सुरु केले. आज 650 शाळांमध्ये व्हर्च्युअल क्लासरुम आहेत. 54 हजार विद्यार्थ्यांना टॅब दिले आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बोर्डांच्या शाळा सुरु करण्यात येत आहेत. पर्यावरणाचे महत्त्व पटावे म्हणून निसर्ग शिक्षण देणारे वाघोबा क्लब, खगोलीय शिक्षण देणाऱया प्रयोगशाळा असे एक ना अनेक उपक्रम सुरु करुन विद्यार्थ्यांचा चौफेर विकास करण्यावर भर दिला जात आहे, अशी माहिती ठाकरे यांनी उपस्थितांना दिली.
वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख म्हणाले की, महानगरपालिकेच्या शाळांमध्ये चांगल्या दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. रस्ते, पूल यासारख्या विकासाच्या सुविधांवर लक्ष देताना महानगरपालिकेच्या शाळांमध्येदेखील तितकेच लक्ष दिले गेले आहे. करदात्यांचा पैसा योग्यरितीने विनियोग केल्यामुळे महानगरपालिकेच्या शाळांबद्दल सकारात्मक दृष्टीकोन निर्माण झाला आहे. पालकमंत्री या नात्याने आदित्य ठाकरे यांनी महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात अतिशय चांगले कार्य केले आहे. ‘सुरक्षित शाळा प्रवेश’ उपक्रम म्हणजे विकास आणि शिक्षण यांचे एकत्रित असे टोटल पॅकेज आहे, अशा शब्दात शेख यांनी उपक्रमाचे कौतुक केले.
शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या की, मी स्वतः महानगरपालिकेच्या शाळेची विद्यार्थिनी आहे. त्यामुळे या शाळांबद्दल मला अधिक स्नेह आहे. या शाळांमधून फक्त विद्यार्थी नव्हे तर, समाजाला आणि देशाला पुढे नेणारा सुजाण नागरिक घडवावयाचा आहे. ही बाब लक्षात घेऊनच शिक्षण विभागात होत असलेले चांगले बदल स्वागतार्ह आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळा या सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून नावाजल्या पाहिजेत, अशी अपेक्षा असल्याचे त्या म्हणाल्या. मागील वर्षांचा कोविड कालावधी हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने अत्यंत कठीण ठरला. शैक्षणिक विकासाला पुन्हा गती देताना ‘सुरक्षित शाळा प्रवेश’ यासारखे उपक्रम महत्त्वाचा हातभार लावणारे ठरतील, असेही त्या म्हणाल्या.
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोगतात सांगितले की, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना महानगरपालिकेच्या शाळांबद्दल विशेष आस्था असून त्यांनी शिक्षण विभागात आधुनिकीकरणाचा पाया रोवला आहे. ते पुढे नेवून अद्ययावत तंत्रज्ञान आधारित गुणवत्तापूर्ण शिक्षण पुरविण्याचे काम पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी सुरु ठेवले आहे. विद्यार्थ्यांना शाळांमधून योग्य मार्गदर्शन मिळाले तर त्यांचं उज्ज्वल भविष्य घडतं. महानगरपालिका प्रशासन सुरक्षित शाळेसारख्या महत्त्वपूर्ण उपक्रमावर निधी खर्च करत असल्याची बाब कौतुकास्पद आहे. कारण आजच्या स्पर्धात्मक युगात चांगल्या दर्जाचे शिक्षण पुरविणे गरजेचे आहे. नागपाडा येथील मिर्जा गालिब रस्ता परिसरापासून सुरक्षित शाळा प्रवेश उपक्रमाची अंमलबजावणी सुरु झाली आहे. या सर्व बदलांना जनतेकडूनही चांगला प्रतिसाद मिळतो आहे, असे नमूद करुन ‘सुरक्षित शाळा प्रवेश’ हा आगळावेगळा उपक्रम नगरविकास खात्याच्या माध्यमातून राज्यभर नेण्यात येईल, त्यासाठी स्पर्धा, विशेष प्रोत्साहन असे प्रयत्न केले जातील, असे आश्वासनही शिंदे यांनी अखेरीस दिले.
सह आयुक्त अजीत कुंभार यांनी प्रास्ताविक केले. तसेच मानसिक समुपदेशन या विषयावर प्रोजेक्ट मुंबईचे संस्थापक शिशीर जोशी यांनी सादरीकरण केले. दंतचिकित्सेबाबत ज्येष्ठ चिकित्सक डॉ. संदेश मयेकर, मधुमेह संदर्भात ब्लू सर्कल डायबिटीज फाऊंडेशनच्या संस्थापक संचालक नुपूर लालवाणी यांनी संगणकीय सादरीकरण केले.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *