
प्रतिनिधी:मिलन शाह
महाराष्ट्र – विधान परिषदेच्या दहा जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. दिनांक 20 जूनला मतदान होईल. या निवडणुकीतून रयत क्रांती संघटनेचे संस्थापक, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांचे नाव सुरुवातीलाच बाजूला पडले आहे. त्यांना यावेळी विश्रांती दिली जाणार असल्याचे भारतीय जनता पक्षाने त्यांना आधीच कळविले असल्याने ते शांत आहेत. त्यांनी जागेची मागणी किंवा तशी इच्छा व्यक्त केलेली नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भाजपबरोबर युती केल्यावर सदाभाऊ खोत यांना भाजपने विधान परिषदेवर आमदार केले. ते ‘स्वाभिमानी’तच असताना त्यांना राज्यमंत्रिपदाची संधी देण्यात आली. त्यानंतर माजी खासदार राजू शेट्टी यांच्याशी तात्त्विक मतभेद सुरू झाले. शेट्टींनी सदाभाऊंना संघटनेतून बाजूला करण्याचा निर्णय घेतला. सदाभाऊंनी स्वतःची रयत क्रांती संघटना स्थापन केली. ती नावाला असली तरी त्यांनी भाजपला 100 टक्के वाहून घेतले. भाजपचे अनेक स्थानिक नेते त्यांना ‘घरचे’ मानत नसले तरी त्यांचे थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वजन आहे. त्यामुळे त्यांनी इकडे काय सुरू आहे, याची फिकीर केली नाही.
प्रारंभी लक्ष्मण वडले आणि सदाभाऊ अशी शेतकरी जोडी होती. पुन्हा राजू शेट्टी आणि सदाभाऊंची जोडी जमली होती. अलीकडे शेट्टींपासून दुरावल्यानंतर सदाभाऊ आणि गोपीचंद पडळकर अशी नवी जोडी पुढे आली. त्यांनी विधान परिषदेत आणि रस्त्यावरही एकत्र लढा उभा केला. त्यामुळे सदाभाऊंना सलग दुसऱ्यांदा आमदारकी मिळेल, अशी अपेक्षा समर्थकांना होती. पक्षातील नवख्यांना संधी दिली जात असल्याबद्दलची ओरड आहेच. त्यामुळे भाजपला समतोल राखावा लागेल. या समतोलात सदाभाऊंचा नंबर नसणार, हे जवळपास स्पष्ट आहे.विरोधात काकणभर चढसदाभाऊंना इस्लामपूरची विधानसभा, हातकणंगलेची लोकसभा असे पर्याय असतील. मात्र, ती लढाई कठीण आहे. सदाभाऊ विधान परिषदेलाच प्राधान्य देतील. आता पुढील निवडणूक सुमारे दोन वर्षांनंतर होणार आहे. एवढ्या पुढचा शब्द कोण देणार? तूर्त त्यांनी महाविकास आघाडीविरोधात जम धरला असून, भाजप नेत्यांपेक्षा ते त्यात अधिक आघाडीवर आहेत.