
प्रतिनिधी:वैशाली महाडिक
आनंदवन मित्र मंडळाचा निधी अर्पण सोहळा.
मुंबई, “जेव्हा आपण काही देत असतो तेव्हा देण्यासारखे खूप काही परमेश्वर आपल्या हातामध्ये टाकत असतो कारण आपल्याला नेहमीच देता येत राहावं मुंबईकरांनी आनंदवन मित्र मंडळाच्या माध्यमातून शांतीवनला दिलेला मदतीचा हात हा वंचितांच्या शोषितांच्या वेदनेशी नातं जोडणारा आणि सामाजिक भान असल्याची कृती करणारा सामाजिक सहभाग आहे या पुण्य कर्माची परतफेड परमेश्वर आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून करत असतो असे प्रतिपादन ज्येष्ठ नेत्र विशारद पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने यांनी नुकताच बोरिवलीतील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात आनंदवन मित्रमंडळाने शांतिवन साठी आयोजित केलेल्या निधी अर्पण सोहळ्यात केले.
याप्रसंगी मेळघाटातील ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ. रवी कोल्हे स्नेहालय संस्थेचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आनंदवन मित्र मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र मेस्त्री, शालन नरेंद्र मेस्त्री शांतीवन चे संस्थापक दिपक नागरगोजे प्रफुल्लजी पुरंदरे सिद्धाराम बंडगर सर उपस्थित होते.याप्रसंगी बोलताना स्नेहालय चे डॉ. गिरीश कुलकर्णी म्हणाले की शांतीवन स्नेहालय सारख्या संस्था महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात आपापल्या परीने समाजातील वंचित घटकांच्या निर्माण झालेल्या प्रश्नावर उत्तर शोधण्याचं काम करीत आहेत या कामाला आर्थिक सहयोग देऊन हत्तीच बळ देण्याचं काम आपल्यासारखे मंडळी करीत असल्यानेच ही कामे सुरू आहेत आणि वंचित घटकातील पीडितांचे अश्रू पुसण्याचे काम करणे शक्य होत आहे. तर आनंदवन मित्र मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र मेस्त्री यांनी बाबा आमटे यांनी घालून दिलेला आदर्श घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी काम करणाऱ्या शांतीवन सारख्या संस्था म्हणजे बाबा आमटे यांच्या आनंदवनाची प्रकाशाची बेटे निर्माण झाले आहेत. आनंदवनाची बेटे निर्माण व्हावी ही बाबा आमटे यांची संकल्पना या संस्थांच्या रुपाने प्रत्यक्षात येत आहे या संस्थांच्या पाठीशी आपण मदतीचा हात उभा केला ही खूप मोठी गोष्ट आहे. याप्रसंगी व्यक्त होताना शांतीवन चे संस्थापक दिपक नागरगोजे म्हणाले की शांतीवन ही संस्था बीड सारख्या दुर्गम आणि दुष्काळग्रस्त भागांमध्ये काम करते जवळ कुठलेही मोठे शहर नाही उद्योग नाहीत देणगीदार नाहीत अशा परिस्थितीत इथे काम करणे जिकिरीचे आहे त्यामुळे नेहमीच पैशाची अडचण भासत असते आणि कामाची तर खूप मोठी गरज असून मोठ्या संख्येने काम करण्याची गरज आहे अनाथ मुलींच्या डोक्यावर छत उभा करण्यासाठी त्यांना हक्काचे घर बांधून देण्यासाठी आनंदवन मित्र मंडळाच्या माध्यमातून मुंबईकरांनी केलेली ही मदत कायम ऋणात ठेवणारी आहे.
पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने , पद्मश्री डॉक्टर रवींद्र कोल्हे डॉक्टर गिरीश कुलकर्णी यांच्या हस्ते याप्रसंगी शांतीवन ला 35 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला शांतीवनातील अनाथ मुलींच्या वसतिगृहासाठी हा निधी जमविण्यात आला आहे. याप्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि मुंबईचे माजी नगरसेवक स्वर्गीय कमलाकर मामा ठाणेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणारा कमलाकर मामा ठाणेकर पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांच्या हमाल पंचायत या संस्थेस देण्यात आला हमाल पंचायत चे कार्यकर्ते हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी उपस्थित होते.या वेळी प्रमुख पाहुण्यांची ओळख /स्वागत आणि संपूर्ण कार्यक्रमाचे सिद्राम बंडगर कार्यवाह यांनी निवेदन केले .