
प्रतिनिधी :मिलन शाह
मुंबई,काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी लोकशाही मार्गाने निवडणूक होऊन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्री. मल्लिकार्जून खरगे निवडून आल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी ही अत्यंत आनंदाची बाब आहे. काँग्रेस पक्ष हा देशातील एकमेव पक्ष आहे जो सर्व समाज घटकांना न्याय देत असतो. माननीय खरगे हे काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी विजयी झाल्याने दलित,वंचित आणि उपेक्षित समाजासाठी अत्यंत अभिमानास्पद व आनंदाची घटना आहे असे मातंग समाजाचे नेते व काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी म्हटले आहे.
काँग्रेस पक्षाने देशाला मजबूत करण्याचे काम केले आहे. लोकांना अखंडपणे जोडण्याचे कार्य केले आहे. काँग्रेसचा हाच विचार घेऊन आयुष्याभर काम करणारे, देशातील संविधान आणि लोकशाही टिकली पाहिजे, रुजली पाहिजे म्हणून सातत्यपूर्ण लढा देणारे, काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ताच देशाला वाचवू शकतो व प्रगतीच्या मार्गावर नेऊ शकतो यावर ठाम विश्वास असणारे काँग्रेसचे निष्ठावंत लढाऊ नेते म्हणून त्यांची ओळख आहे.
मल्लीकार्जून खरगे यांना राजकीय जीवनात पन्नास वर्षांचा मोठा अनुभव आहे. काँग्रेस पक्षाने त्यांना नेहमीच महत्वाच्या व मानाच्या पदावर काम करण्याची संधी दिली व खरगे यांनी ती जबाबदारी अतिशय समर्थपणे पार पाडली आहे.
काँग्रेस पक्षात सर्व जाती-धर्माला योग्य प्रतिनिधीत्व दिले जाते. श्री. खरगे यांच्या रुपाने दलित समाजाला मोठे व मानाचे पद मिळाले आहे. ही संधी दिल्याबद्दल मा. सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी व सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांचे आभार. माननीय मल्लीकार्जून खरगे जी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष पुन्हा चांगली कामगिरी करेल असा विश्वास व्यक्त करून राजहंस यांनी माननीय श्री मल्लीकार्जून खरगे यांचे अभिनंदन करून शुभेच्छाही दिल्या.