महाराष्ट्रद्रोही’ विरोधात महाविकास आघाडीचा हल्लाबोल – अजित पवार

Share

17 डिसेंबरला महाविकास आघाडीचा न भूतो न भविष्यती असा मोर्चा…

मुंबई – महापुरुषांचा होणारा सततचा अपमान, सीमा प्रश्नावरील वाद व राज्याबाहेर जाणारे प्रकल्प या अनुषंगाने महाविकास आघाडी सरकारचा हा मोर्चा असणार असून हा ‘महाराष्ट्रद्रोही’ विरोधात हल्लाबोल असल्याची माहिती राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.

महाविकास आघाडीच्या खासदारांनी आज महाराष्ट्र – कर्नाटक सीमावाद संदर्भात गृहमंत्री अमित शाह यांना निवेदन दिले आहे असेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

शांतता पूर्ण होण्याअगोदरच भडका होईल असे विधान कर्नाटक मुख्यमंत्री बोम्मई करत आहेत. प्रक्षोभक विधाने केली जात आहेत. केंद्रसरकारने या दोन राज्यातील सीमा वादावर तोडगा काढला पाहिजे असेही अजित पवार म्हणाले.

कर्नाटक आणि गुजरात राज्यात जाऊ इच्छिणाऱ्या गावकर्‍यांना विश्वास द्यायला कमी पडले आहे निधी द्यायला कमी पडले आहे हे सरकारचे अपयश आहे असा थेट हल्लाबोलही अजित पवार यांनी केला.

जगातील सर्वात मोठया पक्षाच्या अध्यक्षांना आपले राज्य टिकवता आले नाही ही नामुष्की आहे असा टोलाही अजित पवार यांनी लगावला.
सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन व भत्ते खाजगी बँकांकडे परवानगी देण्याचा विषय झाला होता परंतु अडचणी निर्माण होणार हे लक्षात आल्यानंतर तो रद्द करण्यात आला होता.
मात्र आता कर्नाटक बँकेत जमा करण्याची परवानगी देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. आम्ही दिलेली नाही देवेंद्र फडणवीस साफ खोटं बोलत आहेत. माजी मुख्यमंत्री इतकं खोटं बोलत आहेत याबाबत अजित पवार यांनी आश्चर्य व्यक्त केले. एकीकडे सीमाभागात आगपाखड केली जात आहे आणि दुसरीकडे तुम्ही त्यांचे लांगूलचालन करताय हे ठीक नाही. ७ डिसेंबरला एका दिवसात परवानगी मिळाली कशी मिळते याची माहिती माहितीच्या अधिकारात मागवणार आहोत असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

या महाविकास आघाडीच्या बैठकीला विरोधी पक्षनेते अजित पवार, शिवसेनेकडून माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार संजय राऊत, सुभाष देसाई, मिलिंद नार्वेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,मुंबई अध्यक्ष भाई जगताप, बाळाराम पाटील, रईस शेख, कपिल पाटील, प्रकाश रेड्डी, विनोद निकोले, आदी तिन्ही पक्ष व घटक पक्षाचे नेते उपस्थित होते.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *