
प्रतिनिधी :मिलन शहा
एसएमएस नेटवर्क,पुण्यातील एका चांगल्या कंपनीत नोकरी लागलेली असताना कोरोनाच्या काळात नोकरी गेली. पण ती खचली नाही. गावी जाऊन तिने पुन्हा नव्याने सुरुवात करत पुणे मेट्रोची पहिली लोकोपायलट बनण्याचा बहुमान मिळवला. याबद्दल सातारच्या अपूर्वा आलाटकर यांच्यावर सातारा जिल्ह्यासह देशातून सर्व समाजाच्या विविध घटकांमधून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
अपूर्वा आलाटकर यांनी इयत्ता दहावी पर्यंतचे शिक्षण सातारा येथील अनंत इंग्लिश स्कूल येथे पूर्ण केले . त्यानंतर त्या मॅकेनिकलचे शिक्षण घेण्यासाठी सोलापूर येथील राज्य च्या शासकीय तंत्रनिकेतन येथे प्रवेश घेतला. यशस्वी पणे डिप्लोमा मिळवले नंतर पदवी घेण्यासाठी अपूर्वा आलाटकर पुन्हा सातारा येथे आल्या. त्यांनी ‘ज्ञानश्री इंजिनिअरिंग कॉलेज ‘मधून मॅकेनिकल शाखेतून पदवी मिळवली.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या पुण्यात गेल्या.त्यांना पुण्यातील एका कंपनीत नोकरी मिळाली. सर्व काही सुरळीत सुरु असताना अचानक कोरोना साथ आली. या काळात अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा आली. त्यातच अपूर्वा आलाटकर यांची देखील नोकरी गेली. त्यानंतर त्या पुन्हा सातारा येथे आल्या. काहीच दिवसात पुणे मेट्रोची पदभरतीची जाहिरात आली. त्यात अपूर्वा यांनी अर्ज केला. 2019 मध्ये अर्ज केल्यानंतर सर्व प्रकिया पूर्ण करून त्या फेब्रुवारी 2023 मध्ये त्या पुणे मेट्रोमध्ये दाखल झाल्या.त्यांच्यावर वनाझ मेट्रो स्थानकाच्या स्टेशन कंट्रोलर आणि ट्रेन ऑपरेटर अशी दुहेरी जबाबदारी होती. मात्र 4 फेब्रुवारी 2023 पासून त्या स्टेशन कंट्रोलर म्हणून काम करीत होत्या. मेट्रो ट्रेन चालविण्याची त्यांना या चार महिन्यात एकदाही संधी मिळाली नाही.
दि.1,ऑगस्ट रोजी पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी अपूर्वा यांना प्रथमच लोकोपायलट म्हणून काम करण्याची संधी मिळाली. आपल्या मेट्रोला चक्क पंतप्रधान झेंडा दाखवणार आणि आपण मेट्रो चालवणार, हा आनंद त्यांच्यासाठी आजवरच्या प्रवासाला विसरून टाकणारा होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला आणि पुणे मेट्रोच्या पहिल्या लोकोपायलटने वनाझ मेट्रो स्थानकातून रुबी हॉल क्लिनिक मेट्रो स्थानकाचा प्रवास सुरु केला. पुणे मेट्रोच्या पहिल्या लोकोपायलट बनण्याचा बहुमान त्यांनी मिळवला.
अपूर्वा आलाटकर म्हणाल्या, “माझ्याकडे स्टेशन कंट्रोलर आणि ट्रेन ऑपरेटर अशी दुहेरी जबाबदारी आहे. मात्र मेट्रोत रुजू झाल्यापासून स्टेशन कंट्रोलर म्हणून काम पाहिले. 1 ऑगस्ट रोजी प्रथमच मेट्रो ट्रेन ऑपरेट करण्याची संधी मिळाली. याचा भरपूर आनंद होत आहे.”
Great!!
Congrats!!