प्रतिनिधी :मिलन शहा

लोकल सेवाच्या उडलेल्या बोजवा-याची जबाबदारी कोणाची? रेल्वे व्यवस्थापन कधी सुधारणार?
मुंबई,पहिल्याच मोठ्या पावसात मुंबईची दाणादाण उडाली असून मुंबईच्या अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. कामावर जाणा-या मुंबईकरांचे आज पुन्हा हाल झाले. मुंबईतील मान्सूनपूर्व काम पूर्ण झाल्याचे बीएमसी व राज्य सरकारचे दावे पहिल्याच पावसात धूवून निघाले. महायुतीचे सरकार हे धादांत खोटे बोलणारे असून नालेसफाईच्या आणि मान्सूनपूर्व कामांत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि हलगर्जीपणा करण्यात आल्यानेच मुंबई तंबून मुंबईकरांना नाहक त्रास झाला, असा आरोप मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार प्रा. वर्षा गायकवाड यांनी केला आहे.
महायुती सरकार व मुंबई महानगर पालिकेच्या भ्रष्ट कारभाराचा समाचार घेत खासदार प्रा. वर्षा गायकवाड म्हणाल्या की, मुंबई पहिल्याच मोठ्या पावसात अक्षरशः तुंबली, अनेक रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले, शहराच्या अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने कामाच्या वेळी वाहतूक कोंडी झाली. मिलन सबवे, अंधेरी सबवे, दहिसर सबवे, एलबीएस मार्ग, साकीनाका ९० फूट रोड, माटुंगा, पश्चिम द्रुतगती मार्ग तसेच महालक्ष्मी, दादर, माहीम, धारावी, परळ, शिव, किंग सर्कल, कुर्ला, विद्याविहार, चेंबूर, अंधेरी, मुलुंड, दहिसर या ठिकाणच्या सखल भागांत पाणी मोठ्या प्रमाणात साचून नागरिकांची मोठी गैरसोय झाली.
मुंबईची लाईफलाईन लोकल सेवेचाही बोजवारा उडाला. भांडुप, कांजूरमार्ग, वडाळा, जीटीबी, माटुंगा रोड, दादर, कुर्ला, शिव सारख्या स्थानकांदरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचल्यामुळे तिन्ही रेल्वे लाईनवर मोठा परिणाम झाला. रेल्वे प्रशासन व राज्य शासन यांच्यात योग्य समन्वय नसल्याने रेल्वे रुळाचे कॅनल झाले. ‘आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास’ अशी रेल्वे व्यवस्थापनाची अवस्था आहे. लोकल रेल्वेच्या कारभारावर मा. उच्च न्यायालयानेही मागील आठवड्यात ताशेरे ओढले परंतु रेल्वे व्यवस्थापन गेंड्याचे कातडीचे आहे, त्यांना मुंबईकरांना होत असलेल्या त्रासाबद्दल खेदही वाटत नाही खंतही वाटत नाही. सर्वसामान्यांना जो नाहक त्रास सहन करावा लागत आहे याला जबाबदार कोण? याचे उत्तर राज्य शासन, बीएमसी व रेल्वे प्रशासनाने द्यावे असेही वर्षा गायकवाड म्हणाल्या…
वरळीतील हीट अँड रन प्रकरणातील आरोपीला तत्काळ अटक करा.
महाराष्ट्रात मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्या धनदांडग्यांच्या गाड्यांखाली निष्पाप लोक बळी पडत असून अशा घटनांत वाढ होत आहे. पुणे, नागपूर, जळगाव आणि आता मुंबईत घडलेली घटना चिंताजनक आहे. वरळीतील ४५ वर्षीय महिला कावेरी नाकवा यांना गाडीखाली चिरडून मारणा-या नराधमाला तत्काळ अटक करून कडक शिक्षा करावी,अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार प्रा. वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
वरळीतील अपघात प्रकरणी तीव्र संताप व्यक्त करत वर्षा गायकवाड म्हणाल्या की, भरधाव वेगात गाडी चालवून सामान्य लोकांना नाहक जीव गमवावा लागत आहे.
वरळी प्रकरणातील दोषी मिहीर शाहचे वडील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी दारूच्या नशेत गाडी चालवत होता आणि त्याहूनही धक्कादायक बाब म्हणजे अपघात झाल्यानंतर गुन्हेगाराने गाडी थांबवली नाही. कावेरी नाखवा यांना सुमारे १०० मीटरपर्यंत फरफटत नेले ही बाब मन पिळवटून टाकणारी आहे. या अपघातानंतर तो नराधम घटनास्थळावरून पळून गेला.
आम्ही या प्रकरणाचे राजकारण करू इच्छित नाही, परंतु सरकारने या प्रकरणात जातीने लक्ष घालून पीडित कुटुंबाला त्वरित न्याय मिळवून द्यावा. दोषीला तत्काळ अटक झाली पाहिजे तसेच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करण्यात दोषीला मदत करणाऱ्या सर्व संबंधितांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे.
गेल्या दोन तीन महिन्यांत महाराष्ट्रात अशा चार घटना घडल्या आहेत. बेशिस्तपणे वाहन चालवणे, अतिवेगाने वाहन चालवणे आणि रस्ते अपघातांच्या घटनांमध्येही वाढ हे चिंताजनक आहे. बेभान होऊन सुसाट वाहन चालवण्याची जी वाढती प्रवृत्ती आहे, त्याला वेळीच लगाम घालणे अत्यावश्यक आहे. अशा घटनांमध्ये निष्पाप जीव गमावणे हे कोणत्याही परिस्थितीत परवडणारे नाही. दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांविरुद्धची मोहीम सरकारने अधिक मजबूत केली पाहिजे आणि वाहतूक नियम अधिक कठोर करून त्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली पाहिजे.
हिट अँड रन , ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रकरणे कठोरपणे हाताळली पाहिजेत. कायद्यातील पळवाटांचा फायदा घेऊन गुन्हेगार मुक्त होता कामा नये. कठोर कायदा करून अशा प्रवृत्तींना जरब बसवली पाहिजे अन्यथा धनदांडगे असेच बेदरकारपणे गाडीखाली लोकांना चिरडून मारतील व मोकट वावरतील अशी भितीही वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केली.