दहावीचा पेपर फुटण्याची घटना अत्यंत गंभीर, जबाबदार लोकांवर कठोर कारवाई करा – खा. वर्षा गायकवाड
.बोर्डाच्या परिक्षेतील गैरप्रकार रोखण्यात सरकार व शालेय शिक्षण विभाग अपयशी: सरकारच्या घोषणा हेवतच विरल्या
मुंबई, दि.21 फेब्रुवारी(प्रतिनिधी )मिलन शहा
राज्य सरकारने बोर्डाच्या परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी मोठमोठ्या घोषणा केल्या होत्या पण दहावीच्या परीक्षेतील पहिल्याच दिवशी या घोषणांची हवा निघून गेली. बारावीचा पेपर देखील एका झेरॉक्स सेंटरमध्ये सापडला होता. सरकार आणि शालेय शिक्षण विभाग परिक्षेतील गैरप्रकार रोखण्यात अपयशी का ठरत आहे? असा प्रश्न विचारून पेपरफुटी प्रकरणातील सर्व दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी आणि असे प्रकार पुन्हा होऊ नये यासाठी निर्णायक पावले उचलावीत, अशी मागणी माजी शालेय शिक्षण मंत्री खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
बोर्डाच्या परिक्षेतील गैरप्रकार रोखण्यात अपयशी ठरलेल्या सरकारवर तोफ डागत खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, राज्य मंडळाच्या दहावीच्या पहिल्याच दिवशी पेपरफुटीची घटना घडल्याची बातमी अत्यंत निंदनीय आणि चिंताजनक आहे. तरुण पिढी मोठ्या मेहनतीने परीक्षांची तयारी करते, अशा परिस्थितीत पेपरफुटी आणि कॉपीचे प्रकार होणे म्हणजे प्रामाणिक विद्यार्थ्यांवर सरळसरळ अन्याय आहे, त्यांच्या भविष्याशी खेळ आहे. तरुणांच्या स्वप्नांचा चुराडा करण्याचा अधिकार कोणालाही नाही. राज्य सरकार व परीक्षा महामंडळाच्या गहाळ कारभारामुळेच असे गैरप्रकार वाढत आहेत. राज्य सरकारने केवळ गाजावाजा करून जबाबदारी झटकू नये तर अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी ठोस आणि परिणामकारक उपाययोजना त्वरित जाहीर कराव्यात.
भाजपाच्या राजवटीत दहावी, बारावीचे पेपरच फुटतात असे नाही तर स्पर्धा परिक्षांचेही पेपर फुटतात. पोलीस भरती, तलाठी भरतीच्या वेळी राज्यात पेपरफुटीचे प्रकार उघड झाले आहेत. अशा प्रकारांना आळा घालण्याऐवजी पेपरफुटी झालीच नाही, खोट्या बातम्या देणाऱ्यांवर कारवाई करु असे देवेंद्र फडणवीस यांनी धमकावले होते. आताही दहावी व बारावीच्या परिक्षेत गैरप्रकार झाल्यास त्या केंद्राची परवानगी बंद करण्याची व संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले होते, त्याचे काय झाले? अशी विचारणा खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.