
file photo
प्रतिनिधी :मिलन शहा
मुंबई: मुंबई कोस्टल रोडच्या निर्मितीसाठी अरबी समुद्रातून १११ हेक्टरपेक्षा जास्त जमीन समुद्र किनारी भरावाद्वारे विकसित करण्यात आली आहे. ही नव्याने विकसित झालेली जमीन मुंबईकरांच्या हक्काची आणि हिरवळीची जागा म्हणून जपली गेली पाहिजे, त्यासाठी या जमिनीला ‘सार्वजनिक उद्यान’ आणि ‘किनारी वन’ म्हणून मुंबईच्या विकास आराखड्यात राखीव करण्यात यावे, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार प्रा. वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या पत्रात खासदार वर्षा गायकवाड पुढे म्हणतात की, मुंबई कोस्टल रोडजवळ नव्याने बनलेल्या जागेवर कुठलेही बांधकाम किंवा व्यावसायिक शोषण होणार नाही आणि ही जागा मुंबईकरांची हक्काची मोकळी जागा म्हणून विकसित केली जाईल, या जागेवर कुठलेही बांधकाम केले जाणार नाही किंवा व्यावसायिक कामासाठी ती देणार नाही, असा शब्द मुंबई महापालिका आणि सरकारने यापूर्वीच जनतेला दिला आहे. परंतु कोस्टल रोडचा मोठा भाग वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर भू-माफियांची नजर या जागेवर पडली आहे. मुंबईकरांचे हक्क मारून भविष्यात या जागेचे व्यावसायिक शोषण (commercial exploitation) होऊ शकते अशी शंका मुंबईकरांमध्ये निर्माण झाली आहे, या शंकेचे निरसन होणे गरजेचे आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने १३ सप्टेंबर २०२२ रोजी देखील महानगरपालिकेला स्पष्ट निर्देश दिले आहेत, की या जागेचा वापर फक्त पब्लिक ओपन स्पेस म्हणून करता येईल आणि लॅण्डस्कॅपिंग वगळून इथे कुठल्याही प्रकारचे बांधकाम किंवा व्यावसायिक वापर होणार नाही. त्यावर कधीही व्यावसायीक बांधकाम होता कामा नये ही हमी महापालिकेने आणि शासनाने देणे आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारे या जमिनीचा व्यावसायिक कारणासाठी वापर केला जाऊ नये, ही काँग्रेस पक्षाची आणि मुंबईकरांची भावना आहे असेही खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.