प्रतिनिधी :उत्कर्ष बोर्ले
मुंबई, ता. 28 : बेस्ट प्रशासनाने बेस्ट बसच्या किमान भाड्यात दुपटीने वाढ केली आहे. याची परिणती बसचे प्रवासी रिक्षा – टॅक्सीकडे वळण्यात होईल, असा इशारा देतानाच ही भाडेवाढ मागे घेण्याची मागणी जनता दल सेक्युलर मुंबई पक्षाने केली आहे.
बसचे किमान भाडे पाच रुपयावरून दहा रुपये तर वातानुकुलित बसचे भाडे सहा रुपयावरून बारा रुपये करण्याचा निर्णय रविवारी सुट्टीच्या दिवशी प्रशासनाने जाहीर केला आहे. मुळात प्रवाशांची घटणारी संख्या रोखण्यासाठी बस भाड्यात कपात करण्यात आली होती. त्यामुळे प्रवाशांची संख्या सुमारे १९ लाखावरून ३५ लाखांवर गेली आहे. वास्तवात मुंबईची लोकसंख्या लक्षात घेता शहरासाठी आठ ते नऊ हजार बसची गरज आहे. प्रत्यक्षात बेस्टकडे तीन हजाराहून कमी बस आहेत. त्यामुळे प्रवाशांना अर्धा ते एक तास बस थांब्यावर उभे राहावे लागते. परिणामी ठरलेल्या ठिकाणी वेळेवर पोहोचण्यासाठी प्रवासी रिक्षा टॅक्सी या वाहनांचा वापर करतात. बसची संख्या दुप्पट झाली तरी प्रवाशांची संख्या १५ ते २० लाखाने वाढून बेस्ट उत्पन्नात मोठी वाढ होईलच परंतु रस्त्यावरची रहदारी कमी होऊन वाहतूक कोंडीतूनही मुंबईकरांची सुटका होऊ शकेल.
मात्र, यादृष्टीने काही प्रयत्न करण्याऐवजी भाडेवाढीचा सोपा पर्याय प्रशासनाने निवडला आहे. परंतु त्यामुळे प्रवासी पुन्हा खाजगी वाहने तसेच रिक्षा टॅक्सी याकडे वळून बेस्टच्या उत्पन्नात घट होईलच दुसरीकडे वाहतूक कोंडीतही भर पडेल, असे मुंबई जनता दलाचे अध्यक्ष प्रभाकर नारकर, प्रदेश सचिव संजय परब, कार्याध्यक्ष सलीम भाटी, सरचिटणीस प्रशांत गायकवाड, जिल्हाध्यक्ष संजीवकुमार सदानंद यांनी म्हटले आहे.
बेस्टने तीन वर्षांपूर्वी २१०० बस भाड्याने घेण्याचा निर्णय घेतला होता. परंतु तीन वर्षात या बस मिळू शकलेल्या नाहीत. तरीही संबंधित कंपनीवर प्रशासनाने कोणतीही कारवाई केलेली नाही. एक प्रकारे प्रशासन मुंबईकरांच्या जीवाशीच खेळत आहे, असा आरोपच करून बस भाडेवाढ मागे घ्यावी व मुंबईतील बसची संख्या वाढवून त्यातून उत्पन्न वाढवावे, असे पक्षाने म्हटले आहे.