रोटरी क्लब ऑफ तर्फे कर्मवीर इन्ट्रॅक्ट क्लबची स्थापना..

Share

प्रतिनिधी :वैशाली महाडिक


मुंबई : रयत शिक्षण संस्थेच्या प्रा. डॉ. एन. डी. पाटील विद्यालय, सह्याद्रीनगर येथे रोटरी क्लब ऑफ कांदिवलीच्या पुढाकाराने कर्मवीर इन्ट्रॅक्ट क्लबची उत्साहात स्थापना करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण विकसित करणे आणि त्यांना सामाजिक कार्याची प्रेरणा देणे हा या स्थापनेमागील प्रमुख उद्देश आहे.
कार्यक्रमाची सुरुवात कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. त्यानंतर उपस्थित पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी, मावळत्या अध्यक्षा कुमारी प्राजक्ता सलगर हिने गतवर्षी इन्ट्रॅक्ट क्लबने राबवलेल्या विविध यशस्वी उपक्रमांचा सविस्तर आढावा सादर केला. यामध्ये संस्कार, कौशल्य विकास कार्यक्रम, नौदलाच्या युद्धनौकेला भेट, केशवसृष्टी येथील सेंद्रिय शेतीचा अभ्यास आणि स्नेह मेळाव्यासारख्या कार्यक्रमांचा समावेश होता. विशेषतः ‘प्लास्टिक मुक्त भारत’ या सामाजिक उपक्रमाची तिने प्रशंसा केली.
या सोहळ्यात रुतिका कदम हिची नवीन क्लब अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. पदभार स्वीकारल्यानंतर तिने आगामी वर्षासाठीची आपली उद्दिष्ट्ये स्पष्ट केली. मावळत्या बोर्डाकडून नवीन बोर्डला पिनांचे हस्तांतरण करण्यात आले, जे नेतृत्वातील बदलाचे एक सुंदर प्रतीक होते.
रोटरी क्लबच्या युथ डायरेक्टर रिमा वाही यांनी विद्यार्थ्यांमधील नेतृत्वगुणांना वाव देणाऱ्या या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. सौ. सुनीता हिर्लेकर यांनी इन्ट्रॅक्ट क्लबच्या कार्यप्रणालीची माहिती दिली, ज्यामुळे विद्यार्थ्यांना क्लबच्या कार्याची सखोल माहिती मिळाली. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. जरे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. माजी रोटरी अध्यक्ष राकेश शाह आणि रोटरीचे प्रेसिडेंट नॉमिनी रो. धर्मेंद्र गोहेल यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी, जाई नलवडे हिने पर्यावरणावर एकपात्रिका सादर करून उपस्थितांना पर्यावरणाच्या महत्त्वाविषयी विचार करण्यास प्रवृत्त केले.
क्लबचे अध्यक्ष श्री. जयेश मजीठिया यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात क्लबच्या उद्दिष्टांवर आणि भविष्यातील योजनांवर प्रकाश टाकला. क्लब सेक्रेटरी यश तावरे याने यावर्षी होणाऱ्या प्रमुख उपक्रमांची घोषणा केली, ज्यात संस्कार कार्यक्रम, कौशल्य विकास एकात्मिक कार्यक्रम आणि निकोटिन मुक्तीसाठी जनजागृती या सामाजिक उपक्रमाचा समावेश आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी सौ. एन. के. जगताप यांनी उपस्थितांचे आभार मानले. क्लब अध्यक्ष रुतिका कदम हिने सभा समाप्तीची घोषणा केली. रोटरी क्लब ऑफ कांदिवलीच्या या उपक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये एक नवी ऊर्जा आणि सामाजिक जबाबदारीची भावना निर्माण केली आहे, ज्यामुळे ते भविष्यात चांगले नागरिक बनण्यास नक्कीच मदत करेल.


Share

3 thoughts on “रोटरी क्लब ऑफ तर्फे कर्मवीर इन्ट्रॅक्ट क्लबची स्थापना..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *