
प्रतिनिधी :वैशाली महाडिक
मुंबई : संत ज्ञानेश्वर माऊलींच्या जयंतीनिमित्त सामूहिक पसायदान गायन.चारकोप कांदिवली सह्याद्रीनगर: येथील रयत शिक्षण संस्थेच्या, प्रा. डॉ. एन. डी. पाटील विद्यालयात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या ७०० व्या जयंतीनिमित्त सामूहिक पसायदान गायनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला मुख्याध्यापिका सौ. एस. एम. जरे, सर्व शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. मुख्याध्यापिका सौ. एस. एम. जरे आणि सर्व शिक्षकांनी माऊलींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. त्यानंतर, सर्व विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे पसायदान गायन केले, ज्यामुळे शाळेत भक्तिमय आणि शांततामय वातावरण निर्माण झाले.
यावेळी मुख्याध्यापिका सौ. एस. एम. जरे यांनी पसायदानाचे महत्त्व आणि त्यातील मानवी मूल्यांविषयी माहिती दिली. त्यानंतर, शिक्षक श्री. प्रबळकर एन. एस. यांनी ज्ञानेश्वर माऊली व त्यांच्या भावंडांच्या जीवनप्रवासावर प्रकाश टाकला. त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिण्यामागचे कारण, माऊलींनी लिहिलेले इतर ग्रंथ, हरीपाठाचे महत्त्व आणि पसायदानाचा सखोल अर्थ सोप्या भाषेत समजावून सांगितला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. एस. व्ही. पाटील यांनी प्रभावीपणे केले. कार्यक्रमाच्या शेवटी सौ.एस.व्ही.पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. पसायदानातील विश्वकल्याणाचा संदेश आत्मसात करून आदर्श जीवन जगण्याचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
Gd