
मुंबई : आज आपण अशा काळात जगत आहोत जिथे विज्ञान आणि तंत्रज्ञान रोज नवनवीन चमत्कार घडवत आहेत. यात सगळ्यात सर्वाधिक लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता – म्हणजेच AI (Artificial Intelligence). एकेकाळी केवळ कल्पनेत असलेली ही संकल्पना आज आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे. अगदी शाळेपासून उद्योगविश्वापर्यंत, सर्वत्र AIचा प्रभाव सध्या दिसून येत आहे. कधी नव्हे ते हवामानाचे अंदाज,पावसाचे प्रमाण/अंदाज तंतोतंत योग्य ठरताना दिसत आहेत,ही सारी AI ची कमाल आहे.
शाळेतील शिक्षणात AI चे फायदे :- AI हे केवळ यंत्र नव्हे, तर एक “शिकणारी यंत्रणा” आहे. शाळांमध्ये AI चा वापर केल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या गरजेनुसार शिक्षण मिळू शकते. उदाहरणार्थ, एखादा विद्यार्थी गणितात कमी असला तर AI त्यासाठी खास सराव प्रश्न देऊ शकते. तसेच भाषाशिक्षण, विज्ञान, इतिहास या विषयांमध्येही इंटरअॅक्टिव्ह पॅनल बोर्डमुळे अभ्यास अधिक रंजक आणि सोपा होतो. पूर्वी विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप अभ्यास शिकवित असताना मला उदाहरण सराव देण्यासाठी अनेक पुस्तकं चाळावी लागायची. आज एक उदाहरण चाटजिपीटी वर टाकले आणि मला अशी दहा उदाहरणे बनवून द्या म्हटलं की, मला काही क्षणात दहा उदाहरणं बनवून मिळतात, ज्यामुळे विद्यार्थ्यांचा खूप मोठा सराव होताना मला दिसतोय. त्यामुळे AI आधारित डिजिटल शिक्षक विद्यार्थ्यांचे प्रश्न तत्काळ सोडवतात, जे शिक्षक वर्गात दरवेळी शक्य नसते.प्रत्येक विद्यार्थ्याला स्तरनिहाय वेगळा वेगळा सराव देता येतो त्यामुळे शिक्षकांवरचा भार कमी होतोय आणि विद्यार्थ्यांनाही त्वरित मदत मिळते आणि मुलांचे शिकणे थांबत नाही.
▶️ वेळेची बचत – अधिक कार्यक्षम शिक्षण :- पूर्वी अभ्यासासाठी ग्रंथालयात जावे लागायचे, तासन् तास पुस्तकं चाळावी लागायची. पण आज AI च्या साहाय्याने काही सेकंदांत हवे ते उत्तर मिळते. गृहपाठ, प्रोजेक्ट, भाषांतर, संक्षेप – सगळं अगदी जलद होते. शिक्षकांसाठीही AI फार उपयुक्त ठरते. अभ्यासक्रम नियोजन, मूल्यांकन, उपस्थिती व्यवस्थापन यासारखी कामं AI सहज करू शकते. त्यामुळे शिक्षक विद्यार्थ्यांसोबत अधिक वेळ घालवू शकतात. “गृहपाठ देताना काय द्यावं ? याचा सारखा विचार यायचा…” पण आता टाईप केले – ‘मी शिक्षक आहे’ मला इयत्ता चौथीच्या मराठी विषयातील पाचव्या पाठावर गृहपाठ तयार करून द्या! असं म्हटलं की लगेच जेवढा पाहिजे तेवढा गृहपाठ तयार! विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेनुसार वेगवेगळा गृहपाठ बिल्कुल तयार…
▶️ ज्ञानात भर – वैविध्यपूर्ण आणि सखोल अभ्यास :- AI फक्त अभ्यासाची माहिती देत नाही, तर त्या माहितीचा अर्थ समजावून सांगतो. विद्यार्थ्यांच्या वय, आवडीनिवडी आणि स्तरानुसार AI योग्य पद्धतीने शिक्षण देते. उदाहरणार्थ, AI एखाद्या विद्यार्थ्याला विज्ञानात रस असल्यास त्या विषयावर अधिक माहिती देतो, प्रयोग, व्हिडीओज, प्रश्नोत्तरेसुद्धा देऊ शकते. त्याचप्रमाणे जगभरातील ताज्या घडामोडी, विविध भाषांतील माहिती, नवनवीन विषयांवरचा अभ्यास – हे सगळं AI मुळे एका क्लिकवर उपलब्ध आहे. हे ज्ञान फक्त पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित राहत नाही, तर विद्यार्थ्यांचे विचार अधिक व्यापक आणि समृद्ध बनवते.
AI मुळे शिक्षणात समावेश आणि संधी :- माझ्या रयत शिक्षण संस्थेने शहरापासून खूप दूर असलेल्या खेडयातील विद्यार्थ्यांनाही आता गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून दिले आहे, याचे श्रेय AI ला आणि AI हा नवा उपक्रम सुरू करायला सांगणाऱ्या दूरदृष्टी नेतृत्वाला जाते.हे नेतृत्व म्हणजे आमच्या संस्थेचे अध्यक्ष मा. शरदचंद्रजी पवार साहेब आणि चेअरमन मा. चंद्रकांत दळवी साहेब हे होत. ऑडिओ बुक्स, व्हिडीओ लेक्चर्स, भाषांतर अॅप्स यामुळे भाषा अडथळा राहत नाही. विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी AI विशेष साधनं देते – जसं की स्क्रीन रीडर, व्हॉइस कमांड, आर्टिफिशियल वाचन सहाय्य. एवढ्या मोठ्या संस्थेच्या प्रत्येक शाळेत, कॉलेज मध्ये इन्ट्रॅक्टइव्ह पॅनल बोर्ड उपलब्ध करून दिले आहेत त्यामुळे खूपच फायदा होताना दिसत आहे.
▶️ उपसंहार :- AI ही केवळ यंत्राची प्रणाली नसून एक अशी संधी आहे, जी योग्य वापरल्यास शिक्षणाची दिशा आणि दशा दोन्ही बदलू शकते. शिक्षकांची मदत, विद्यार्थ्यांची मेहनत आणि AI चे तंत्रज्ञान – यांचा मेळ साधला तर शिक्षण अधिक प्रभावी, सर्वसमावेशक आणि आनंददायी होईल. आजचा विद्यार्थी केवळ पुस्तकापुरता मर्यादित नाही, तर तो जगभरातील माहिती काही क्षणांत शोधू शकतो – हे AI मुळे शक्य झाले आहे. शिकवण्याची पद्धत बदलत आहे, शिकण्याचा दृष्टिकोनही बदलतो आहे. शाळांमधील अभ्यासक्रम अधिक रंजक, वैयक्तिक आणि प्रभावी होत आहे. AI केवळ वेळ वाचवत नाही, तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या गरजा लक्षात घेऊन त्याला योग्य मार्गदर्शन देते. त्यामुळे शिक्षण अधिक समावेशक, सर्वांपर्यंत पोहोचणारं आणि गुणवत्तापूर्ण होत आहे.
आपण एक गोष्ट मात्र लक्षात घेतली पाहिजे की, AI हे साधन आहे- शिक्षकांची जागा नाही, पण त्यांचा हातभार लावणारा मदतनीस आहे. याचा योग्य वापर केला तर शिक्षणाची वाट अधिक प्रकाशमान होईल. AI मुळे जग खरंच बदलत आहे आणि “हे परिवर्तन योग्य दिशेने घडवायचं की नाही, हे आता आपल्यावरच आहे!”
लेखक – उमाकांत जगताप
(प्रभारी मुख्याध्यापक)
प्रा.डॉ.एन.डी.पाटील
विद्यालय,सह्याद्रिनगर,
कांदिवली(पश्चिम),
मुंबई-400067.
नवीन तंत्रद यानचा सदुपयोग
Great to know that this school is having Such advance and needed educational subject
Greattt