CSMT वर छ. शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारा..

Share

एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोर्ले.

मुंबई : मुंबईतील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) रेल्वे स्थानकाच्या दर्शनी भागात छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारावा, अशी मागणी मिलिंद नार्वेकर यांनी विधानपरिषदेत औचित्याच्या मुद्द्याद्वारे केली.
मुंबईतील ऐतिहासिक विक्टोरिया टर्मिनस (VT) या स्थानकाचे नाव १९९६ मध्ये बदलून ‘छत्रपती शिवाजी टर्मिनस’ (CST) करण्यात आले होते. त्यानंतर जून २०१७ मध्ये ‘महाराज’ हा शब्द अधिकृतरित्या जोडण्यात आला आणि स्थानकाचे नाव ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’ (CSMT) असे करण्यात आले. हे मध्य रेल्वेचे मुख्यालय असून युनेस्कोने घोषित केलेले जागतिक वारसा स्थळ आहे.
मात्र या स्थानकाला महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देऊन सुमारे २० वर्षांहून अधिक काळ उलटला तरीही स्थानक परिसरात शिवरायांचा भव्य पुतळा उभारण्यात आलेला नाही, ही खेदाची बाब असल्याचे नार्वेकर यांनी नमूद केले.
या स्थानकात शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याची मागणी अनेक लोकप्रतिनिधी व विविध संघटनांकडून सातत्याने राज्य व केंद्र सरकारकडे केली जात आहे. दरम्यान, स्थानकाच्या नवीन पुनर्विकास आराखड्यात शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याचा समावेश करण्यात आल्याची माहिती राज्य सरकारने दिली असल्याचेही त्यांनी सांगितले.
शिवरायांच्या वारशाचा सन्मान राखण्यासाठी CSMT स्थानकाच्या दर्शनी भागात भव्य पुतळा उभारण्याच्या कामाला तातडीने सुरुवात करण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी मागणीही नार्वेकर यांनी यावेळी केली.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *