अदानी वीज कंपनी विरोधात MERCकडे औपचारिक तक्रार..

Share

एसएमएस -प्रतिनिधी -मिलन शहा.

मुंबई : अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड (AEML) कडून ३१.८० लाख किरकोळ वीज ग्राहकांकडून बेकायदेशीररीत्या “व्हीलिंग शुल्क” आकारले जात असल्याचा आरोप करत वॉचडॉग फाउंडेशनने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे (MERC) औपचारिक तक्रार दाखल केली आहे. अदानी स्वतःच्या डहाणू औष्णिक वीज प्रकल्पातून वीज निर्माण करून ती स्वतःच्या पारेषण व वितरण जाळ्याद्वारे पुरवत असताना व्हीलिंग शुल्क आकारणे हे वीज कायदा २००३ च्या विरोधात असल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, पालघर जिल्ह्यातील डहाणूजवळील अदानीच्या ५०० मेगावॅट क्षमतेच्या कोळसा-आधारित प्रकल्पातून वीज निर्मिती होते. ही वीज अदानीच्या स्वतःच्या पारेषण वाहिन्यांद्वारे गोरेगाव (पूर्व) येथील आरे मिल्क कॉलनीतील रिसिव्हिंग स्टेशनला आणली जाते आणि तेथून मुंबईच्या पश्चिम उपनगरांतील तसेच मीरा-भाईंदर परिसरातील ग्राहकांना वितरित केली जाते.

वीज कायद्यानुसार व्हीलिंग शुल्क केवळ तृतीय-पक्ष जनरेटरकडून किंवा खुल्या प्रवेश (ओपन ॲक्सेस) व्यवस्थेद्वारे वीज घेतली जात असल्यास लागू होते. मात्र, या प्रकरणात कोणताही तृतीय-पक्ष किंवा बाह्य जाळ्याचा वापर होत नसल्याने व्हीलिंग शुल्क आकारणे बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या MSEDCL विरुद्ध JSW स्टील प्रकरणातील निकालाचा हवाला देत, अशा शुल्कांची अंमलबजावणी केवळ ओपन ॲक्सेस प्रकरणांपुरती मर्यादित असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
वॉचडॉग फाउंडेशनने या शुल्कामुळे ग्राहकांवर अवाजवी आर्थिक भार पडत असल्याचा आणि नेटवर्क खर्चाची दुहेरी वसुली होत असल्याचा आरोप केला आहे. संस्थेने MERCकडे व्हीलिंग शुल्काच्या कायदेशीरतेची चौकशी, शुल्क तात्काळ थांबवण्याचे आदेश आणि आधी वसूल केलेल्या रकमेचा व्याजासह परतावा देण्याची मागणी केली आहे.
ही तक्रार वॉचडॉग फाउंडेशनचे विश्वस्त निकोलस अल्मेडा, अॅड. गॉडफ्रे पिमेंटा तसेच सल्लागार व्हिव्हियन डिसोझा आणि रीटा डीसा यांच्या वतीने दाखल करण्यात आली आहे.


Share

One thought on “अदानी वीज कंपनी विरोधात MERCकडे औपचारिक तक्रार..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *