एसएमएस -प्रतिनिधी -सुरेश बोर्ले
मुंबई :नुकत्याच शाळा व महाविद्यालयांच्या परीक्षा संपल्यामुळे कोकणाकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, मोजक्याच रेल्वे गाड्या उपलब्ध असल्याने बहुतांश रेल्वे तिकिटे संपली असून, चाकरमान्यांचा हिरमोड झाला आहे. एसटीचीही परिस्थिती याचप्रमाणे असल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, मुंबईहून उत्तर व दक्षिण भारताकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांची संख्या तुलनेने अधिक असल्याने स्थानिक प्रवाशांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. परप्रांतियांना अधिक सुविधा दिल्या जात असल्याचा आरोपही होत आहे.
या पार्श्वभूमीवर मनसेने या प्रश्नाची दखल घेतली असून संघटना आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे. याच कारणास्तव मनसेचे पदाधिकारी आज रेल्वे प्रशासनाला जाब विचारण्यासाठी भेट देणार आहेत. मनसेने घेतलेल्या या भूमिकेचे जनतेतून स्वागत व कौतुक होत आहे.