पार्ले पूर्वेत मनपाचा भोंगळ कारभार..

Share

एसएमएस -प्रतिनिधी -सुरेश बोर्ले

मुंबई :पार्ले  पूर्व परिसरातील मनपाच्या निष्क्रीय आणि विस्कळीत कारभारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. विलेपार्ले पूर्वेतील शहाजी राजे मार्ग छेदित शिवसेना शाखा गल्ली, दुर्वांकुर इमारतीसमोरील रस्त्याच्या छोट्या वळणावर मनपाने काही दिवसांपूर्वी गतिरोधक (स्पीड ब्रेकर) तयार केला होता. मात्र, अवघ्या काही दिवसांतच हा गतिरोधक काढून टाकण्यात आला आहे.

या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, “गतिरोधक टाकण्यामागील उद्देश काय आणि तो काढण्याचे कारण काय?” असा सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे. विनाकारण उभारलेला गतिरोधक त्वरित काढल्यामुळे सार्वजनिक निधीचा अपव्यय झाल्याची टीका होत आहे.

दरम्यान, गतिरोधक काढताना निर्माण झालेला मलवा रस्त्याच्या कडेला तसाच टाकून देण्यात आला आहे. हा मलवा अनेक दिवसांपासून न उचलल्यामुळे परिसरात अस्वच्छता वाढली असून, डासांची समस्या आणखी तीव्र होत असल्याची तक्रार नागरिक करत आहेत.

हा भाग दाट लोकवस्तीचा असून येथे दुचाकी व इतर वाहनांच्या पार्किंगची मोठी समस्या आहे. संबंधित ठिकाण स्वच्छ करून मलवा हटविल्यास किमान ५ ते ६ दुचाकी पार्किंगची सोय होऊ शकते, असे स्थानिकांचे मत आहे.

तरी स्थानिक नगरसेवक आणि मनपा प्रशासनाने तातडीने लक्ष घालून हा मलवा हटवावा व नागरिकांच्या अडचणी दूर कराव्यात, अशी मागणी परिसरातील रहिवाशांकडून केली जात आहे.


Share

One thought on “पार्ले पूर्वेत मनपाचा भोंगळ कारभार..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *