मनोरी-गोराईतील नि:क्षारीकरण प्रकल्पाला मच्छिमारांचा विरोध

Share

एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोरले.

मुंबई : मनोरी-गोराई समुद्रकिनारी प्रस्तावित नि:क्षारीकरण प्रकल्पाच्या सर्वेक्षणाला व प्रकल्पालाच विरोध दर्शवित शुक्रवारी (ता. २१) हजारो मच्छिमार व भूमिपुत्रांनी रॅली काढली. महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे (MMKS) अध्यक्ष लिओ कोलासो यांच्या नेतृत्वाखाली मनोरी मार्केट ते बाण डोंगर, मनोरी येथील प्रस्तावित प्रकल्पस्थळापर्यंत ही रॅली काढण्यात आली. नॅशनल फिशवर्कर्स फोरम (NFF) तसेच मढ ते गोराई मच्छिमार संघर्ष समितीच्या सहकार्याने आयोजित या आंदोलनातून मुंबई महापालिकेच्या प्रस्तावित प्रकल्पाला तीव्र विरोध करण्यात आला.
यावेळी लिओ कोलासो यांनी महापालिकेवर टीका करताना, ‘मनोरी-गोराईतील नागरिकांना गेल्या ७० वर्षांत पुरेसे पिण्याचे पाणी देता आले नाही. मात्र, किनारपट्टीवर विविध मोठे प्रकल्प आणून पारंपरिक मच्छिमारांच्या उपजीविकेवर गदा आणली जात आहे,’ असा आरोप केला. ‘मनोरी-गोराईतील नागरिकांच्या हिताला बाधा आणणारा हा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही,’ असा इशाराही त्यांनी दिला.
मच्छिमार कृती समितीचे सरचिटणीस किरण कोळी यांनी प्रकल्पाच्या क्षमतेबाबत प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, प्रकल्पात दररोज ५०० दशलक्ष लिटर म्हणजेच ५० कोटी लिटर समुद्राचे पाणी घेतले जाणार असून त्यातून सुमारे २० कोटी लिटर पाण्याचे शुद्धीकरण केले जाणार आहे. उर्वरित मोठ्या प्रमाणातील क्षारयुक्त पाणी पुन्हा समुद्रात सोडल्यास त्याचा समुद्री जैवविविधता, मत्स्यप्रजनन आणि पारंपरिक मासेमारीवर परिणाम होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
‘हा प्रकल्प मच्छिमारांच्या रोजीरोटीवर घाला घालणारा आहे. येत्या १५ दिवसांत प्रकल्पाचे काम थांबवून तो गुंडाळावा; अन्यथा मोठे आंदोलन छेडण्यात येईल,’ असा इशारा किरण कोळी यांनी दिला. आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, प्रस्तावित प्रकल्पासाठी होणाऱ्या खर्चावरही आंदोलकांनी प्रश्न उपस्थित केले. प्रकल्पाचा खर्च सुमारे २,६५० कोटी रुपये असल्याचा दावा करत, या निधीचा अन्य पर्यायी जलस्रोत उभारण्यासाठी वापर करता येऊ शकतो, असे कोळी यांनी सांगितले. मनोरी-गोराई परिसराला या प्रकल्पातून मिळणाऱ्या पाण्याच्या प्रमाणाबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केला.
यावेळी राजेश्री भानजी, राजीव कोळी, दीपक वासावे, माजी नगरसेवक निकोलस अल्मेडा, ऑस्कर मेंडोसा, सिस्टर क्रिस्टल, प्रिन्सीला डिसोझा, मॅकेंसी डाबरे, दिगंबर वैती आदींनी मनोगत व्यक्त केले.
रॅलीस मिरा-भाईंदरचे नगरसेवक टेरेन मेंडोसा, शॉन कोलासो, नगरसेविका शर्मिला गंडोळी, मालवणी अध्यक्ष गोविंदा कोळी, हरबादेवी अध्यक्ष प्रमोद पाटील, मढ मच्छिमार संचालक सुरेश नगी, मढ दर्यादीप संचालक नवीन कोळी, मनोरी सागरदीप अध्यक्ष रमाकांत कोळी, नारायण कोळी आदी उपस्थित होते. नेव्हील डिसोझा यांनी सूत्रसंचालन केले. गोराई मच्छिमार संघटनेचे सचिव रॉनी केनी, संचालक मंडळ तसेच दि मनोरी फिशरमन संस्थेचे अध्यक्ष सायमन गारोडी व संचालक मंडळाने रॅलीचे आयोजन केले.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *