
एसएमएस -प्रतिनिधी -सोमा डे.
मुंबई : मालाड पश्चिमेतील मार्वे रोडवरील खारोडी परिसरात मागील सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या जलगळतीमुळे लाखो लिटर पिण्याच्या पाण्याची नासाडी होत असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. महत्त्वाच्या मार्वे रोडवरून दररोज मोठ्या प्रमाणात शासकीय, प्रशासकीय तसेच महापालिका अधिकाऱ्यांची वाहने ये-जा करतात. मात्र, एवढ्या महत्त्वाच्या रस्त्यावर सुरू असलेली जलगळती अद्याप थांबवण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
एकीकडे मुंबईकरांना ‘जल ही जीवन है’ असा संदेश देणाऱ्या महापालिकेकडूनच पाण्याची अशा प्रकारे नासाडी होत असल्याचे चित्र दिसत आहे. विशेष म्हणजे, याच मार्गावरून महापालिकेच्या जल खात्याचे कर्मचारी दररोज सकाळी आणि संध्याकाळी पाणीपुरवठ्याच्या चाव्या सुरू-बंद करण्यासाठी ये-जा करतात. मात्र, त्यांच्या निदर्शनासही ही जलगळती अद्याप आली नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे.
स्थानिक रहिवाशांनी या जलगळतीबाबत महापालिकेच्या हेल्पलाइनवर तसेच पी-पश्चिम विभागाकडे अनेक वेळा तक्रारी करून माहिती दिल्याचे सांगितले. तरीही जल विभागाकडून अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा दावा रहिवाशांनी केला आहे.
सध्या मुंबईत १० टक्के पाणीकपात लागू असताना, एका बाजूला नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले जात आहे, तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात पिण्याचे पाणी वाया जात असताना महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष का होत आहे, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
मार्वे रोडवरील ही जलगळती तातडीने दुरुस्त करून पाण्याची नासाडी थांबवावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी महापालिकेच्या पी-पश्चिम वीभागाकडे केली आहे.