
एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोरले.
मुंबई : समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द आणि शिक्षणाची आस मनात बाळगून निवृत्त शिधावाटप अधिकारी असावरी देसाई यांनी एक आदर्श उदाहरण समाजापुढे ठेवले आहे. स्वतःच्या खर्चातून शाळेच्या वर्गखोल्या उभारून त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे खुली केली आहेत.
असावरी देसाई या शिधावाटप विभागात लिपिक म्हणून कार्यरत होत्या. त्या ठाणे येथे वास्तव्यास असून त्यांचे मूळ गाव व्हेळ हे रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात आहे. आपल्या गावातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, हे त्यांचे स्वप्न होते.
सुरुवातीला गावात केवळ पहिली ते चौथीपर्यंतची शाळा होती. मात्र, पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना दूरच्या ठिकाणी जावे लागू नये, या उद्देशाने देसाई कुटुंबाने पुढाकार घेत स्वतःच्या खर्चाने पाचवी ते आठवीपर्यंतच्या वर्गांसाठी शाळेची इमारत उभारली. या शाळेला “भास्कर-रुक्मिणी विद्यालय” असे नाव देण्यात आले.
मात्र, असावरी देसाई यांचे स्वप्न केवळ आठवीपर्यंत मर्यादित नव्हते. गावातील विद्यार्थ्यांना आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षणही गावातच मिळावे आणि त्यांना तालुक्याच्या ठिकाणी किंवा इतर गावांमध्ये जावे लागू नये, अशी त्यांची इच्छा होती. “शिक्षण हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे आणि कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये,” हा त्यांचा ठाम विश्वास होता.
या उद्देशाने त्यांनी शासनाकडून आर्थिक मदत मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. तत्कालीन लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या सहकार्यामुळे २० लाख रुपयांचे अनुदान मिळाले. मात्र, ही रक्कम अपुरी असल्याने त्यांनी मित्रपरिवार, नातेवाईक आणि इतर माध्यमांतून आणखी १७ लाख रुपये जमा केले. अशा प्रकारे एकूण ३७ लाख रुपयांचा निधी उभारून आठवी ते दहावीचे वर्ग सुरू करण्यात आले.
सागरुळ शिक्षण संस्थेच्या सहकार्याने करवीर तालुका, कोल्हापूर जिल्ह्यात हे शैक्षणिक कार्य साकार झाले. आज भास्कर-रुक्मिणी विद्यालय शैक्षणिक गुणवत्ता, सांस्कृतिक उपक्रम आणि शिस्त या सर्व बाबतीत उल्लेखनीय काम करत असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील आहे.
स्वतःसाठी प्रत्येकजण जगतो; मात्र इतरांच्या प्रगतीसाठी, त्यांच्या आनंदासाठी आणि समाजाच्या उन्नतीसाठी आयुष्य समर्पित करणारे व्यक्तिमत्त्व फार कमी असतात. असावरी देसाई या अशाच समाजाभिमुख व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहेत.
समाजाला काहीतरी परत देणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, या विचारातून त्यांनी केलेले शैक्षणिक कार्य अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या ध्येयवेड्या आणि समाजहिताच्या कार्यातून शिक्षणसेवेची नवी प्रेरणा मिळत आहे.