
एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोर्ले
मुंबई : दि. २ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास बोरीवली पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक कौतुकास्पद घटना घडली. विकास चव्हाण हे जाहिरात व लघु-मोठ्या शूटिंगचे दिग्दर्शन करणारे व्यावसायिक गोराई बीच येथे शूटिंगसाठी जात असताना रिक्षामधून उतरताना आपली मौल्यवान वस्तूंची बॅग रिक्षामध्येच विसरले. संबंधित रिक्षा चालक बॅगसह निघून गेल्याने चव्हाण यांची मोठी अडचण निर्माण झाली.
या बॅगेमध्ये एक लॅपटॉप (किंमत सुमारे ३ लाख रुपये), टॅबलेट (५० हजार रुपये), कॅमेरा (५० हजार रुपये) तसेच इतर साहित्य मिळून सुमारे ५ लाख रुपयांच्या वस्तू होत्या. विशेष म्हणजे लॅपटॉपमधील महत्त्वपूर्ण डेटा सुमारे १६ लाख रुपयांच्या किमतीचा असल्याने एकूण नुकसान अंदाजे २१ लाख रुपयांचे होण्याची शक्यता होती.
घटनेची माहिती मिळताच विकास चव्हाण यांनी तात्काळ बोरीवली पोलिस ठाण्यात धाव घेऊन PSI सागर मॅडम यांच्याकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची गंभीरता लक्षात घेऊन गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस कॉन्स्टेबल योगेश खेडकर, पोलीस कॉन्स्टेबल ऋषिकेश नाईकरे, प्रथम तपासी अंमलदार विलास सातपुते तसेच पोलीस उपनिरीक्षक वुद्रे यांनी कोणताही विलंब न करता तपास सुरू केला.
पोलिसांच्या जलद हालचाली आणि तांत्रिक तपासाच्या आधारे अवघ्या एक तासाच्या आत संबंधित रिक्षाचा शोध घेण्यात यश आले आणि बॅगमधील सर्व मौल्यवान वस्तू सुरक्षितपणे तक्रारदाराला परत करण्यात आल्या.
बोरीवली पोलिसांच्या या तत्पर व कार्यक्षम कामगिरीमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत असून, “मुंबई पोलीस सदैव तत्पर” हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
Great