
एसएमएस. प्रतिनिधी -उत्कर्ष बोरले
मुंबई :बोरीवली प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) येथे भ्रष्टाचाराचे गंभीर प्रकरण उघडकीस आले असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) आरटीओमध्ये कार्यरत असलेल्या वरिष्ठ लिपिक मिथुन विलास आडे याला लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली आहे. या कारवाईमुळे परिवहन विभागात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका वाहनासंबंधित प्रकरणात तक्रारदारावर ₹26,500 इतका दंड आकारण्यात आला होता. हा दंड कमी करून देण्यासाठी वरिष्ठ लिपिक मिथुन आडे याने तक्रारदाराकडे ₹5,000 लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. त्यानंतर झालेल्या चर्चेत ही रक्कम ₹4,000 वर निश्चित करण्यात आली.
तक्रारदाराला लाच द्यायची नसल्याने त्याने या प्रकरणाची तक्रार एसीबीकडे केली. तक्रार प्राप्त झाल्यानंतर एसीबीने पडताळणी केली असता लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर एसीबीने सापळा रचून 1 जून 2026 रोजी आरोपीला ₹4,000 ची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, 1988 च्या कलम 7 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. सरकारी कार्यालयांमधील भ्रष्टाचाराविरोधात करण्यात आलेली ही कारवाई महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
सुन्दर कामगिरी केली आहे