कलिना जांभळी पाड्यात कचऱ्याचे साम्राज्य..

Share

एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोरले

मुंबई : सांताक्रूझ (पूर्व) येथील कालिना परिसरातील जांभळी पाडा येथे कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले असून, साचलेल्या कचऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कचरापेटीमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने नागरिकांना कचऱ्यातून वाट काढत ये-जा करावी लागत आहे.

साचलेल्या कचऱ्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून डासांचा प्रादुर्भावही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे तापासह विविध साथीच्या आजारांचे रुग्ण आढळत असल्याचे स्थानिक रहिवाशांनी सांगितले. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, पूर्वी मुंबई महानगरपालिकेची कचरा संकलन करणारी गाडी दिवसातून तीन वेळा येत असल्याने कचरा वेळेवर उचलला जात होता. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून ही गाडी दिवसातून केवळ एकदाच येत असल्याने दिवसभर कचरा साचून राहतो. कचऱ्याचे प्रमाण वाढल्याने तो रस्त्यावरही पसरत असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

याशिवाय परिसरातील अनेक हॉटेल, रेस्टॉरंट तसेच आजूबाजूच्या सोसायट्यांमधील कचराही याच ठिकाणी टाकला जात असल्याने कचऱ्याचे प्रमाण आणखी वाढत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.

पालिकेने पूर्वीप्रमाणे दिवसातून तीन वेळा कचरा संकलन करावे, तसेच परिसरात नियमित धूर फवारणी करून डासांचे निर्मूलन करावे, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *