
एसएमएस -प्रतिनिधी -सोमा डे.
मुंबई : मराठी सक्तीच्या विरोधात रिक्षाचालकांनी कांदिवली लिंक रोडवर रिक्षा रस्त्यातच उभ्या करून आंदोलन केल्याने सोमवारी सायंकाळी वाहतूक कोंडी झाली. सुमारे २० मिनिटांहून अधिक काळ लिंक रोडवरील वाहतुकीचा वेग मंदावल्याने प्रवासी तसेच वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
दरम्यान, प्रवासी घेऊन जाणाऱ्या काही रिक्षाचालकांना धमकावल्याचा आरोप करण्यात आला. तसेच काही अमराठी रिक्षाचालकांनी मराठी सक्तीच्या विरोधात आंदोलन करत रस्ता अडवल्याचा आरोपही करण्यात आला. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
आंदोलनामुळे लिंक रोडवरील वाहतूक विस्कळीत होऊन वाहनांच्या रांगा लागल्या. घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. रस्त्यावर उभ्या केलेल्या रिक्षा हटवून वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले. वाहतुकीवर झालेल्या परिणामामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत होती.
दरम्यान, मालाड पश्चिम परिसरातही रिक्षांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे दिसून आले. तसेच शेअरिंग ऑटो उपलब्ध नसल्याने मालवणीतील प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. कामावर जाणारे तसेच घराकडे परतणारे प्रवासी रिक्षांच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र होते.
चौकट : अघोषित रिक्षाबंदचा फटका
मराठी सक्तीच्या विरोधात उत्तर भारतीय रिक्षाचालकांकडून मालाड, चारकोप, राठोडी, कांदिवलीसह पश्चिम उपनगरातील काही भागांत अघोषित रिक्षाबंद आंदोलन सुरू असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे रिक्षा सेवा विस्कळीत झाली असून, प्रवाशांना पर्यायी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत आहे.