गोरेगावात संविधान दिन उत्साहात साजरा.

Share

एसएमएस -प्रतिनिधी -सोमा डे.

‘मेरा देश, मेरा वोट’ अभियान मुंबईत सुरू करण्याची घोषणा; सामाजिक समता, पारदर्शक प्रशासन आणि प्रभावी न्यायव्यवस्थेवर वक्त्यांचा भर

मुंबई : भारतीय संविधानाच्या ऐतिहासिक स्वीकृती दिनानिमित्त २६ नोव्हेंबर रोजी गोरेगाव पश्चिम येथे द बॉम्बे कॅथोलिक सभा आणि संविधान जागर यात्रा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिन साजरा करण्यात आला. सायंकाळी ५ ते ६.३० या वेळेत आयोजित कार्यक्रमात संविधानाच्या प्रास्ताविकेतील न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. तसेच लोकशाही आणि संविधानाचे संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी सक्रिय भूमिका बजावण्याचे आवाहन करण्यात आले.

आज देशासमोर सामाजिक आणि आर्थिक विषमता, धार्मिक व वर्गीय आधारावरील द्वेषपूर्ण वक्तव्ये, द्वेषमूलक गुन्हे तसेच प्रशासनातील अपारदर्शकता यांसारखी अनेक आव्हाने आहेत. संविधानाने सर्वांना समान न्याय आणि अधिकारांची हमी दिली असली, तरी प्रत्यक्ष परिस्थितीत या मूल्यांची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. लोकशाही केवळ औपचारिक कार्यक्रमांपुरती मर्यादित न ठेवता संस्थात्मक सुधारणा, जलद व प्रभावी न्यायव्यवस्था आणि उत्तरदायी व पारदर्शक प्रशासनासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

सत्ताधारी व्यवस्थेकडूनच संविधान आणि लोकशाही धोक्यात असल्याचे सांगत रस्त्यावर आंदोलने केली जात असल्याची विसंगतीही वक्त्यांनी अधोरेखित केली. दुसरीकडे संविधानातील मूल्ये आणि आंदोलन करण्याच्या अधिकारासह नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणली जात असल्याची खंत व्यक्त करण्यात आली.

या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार युवराज मोहिते, अॅड. रॅचेल डिसिल्वा, संविधान जागर यात्रा समितीचे श्रीधर शेलार, सामाजिक कार्यकर्ते सलीम साबूवाला, BAMCEFचे किरण सावंत आणि बॉम्बे कॅथोलिक सभेचे डॉल्फी डिसोझा यांनी उपस्थितांना संबोधित केले.

यावेळी दिल्लीतून सुरू करण्यात आलेल्या ‘मेरा देश, मेरा वोट’ या अभियानाची मुंबईतही सुरुवात करण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाला बॉम्बे कॅथोलिक सभेचे अध्यक्ष नॉर्बर्ट मेंडोन्सा आणि उपाध्यक्ष ब्रायन डिसोझा उपस्थित होते.

द बॉम्बे कॅथोलिक सभेच्या अवर लेडी ऑफ रोझरी चर्च, गोरेगाव युनिटतर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सभेचे उपाध्यक्ष अॅलेक्स डिसोझा यांनी कार्यक्रमाचे समन्वयन केले.


Share

3 thoughts on “गोरेगावात संविधान दिन उत्साहात साजरा.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *