
एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोरले.
मुंबई : दिवाळी हा केवळ दिव्यांची रोषणाई, फटाके आणि फराळाचा उत्सव नसून विवेक, संवेदनशीलता आणि समाजातील अंधार दूर करण्याचा संस्कार आहे, असा संदेश देत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांप्रती ऐक्य आणि संवेदना व्यक्त करणारा ‘दिवाळी संध्या’ हा आगळावेगळा सांगीतिक व सांस्कृतिक कार्यक्रम श्रद्धा डान्स अकॅडमीच्या पुढाकाराने बर्वेनगर, घाटकोपर येथे दिवाळीच्या पूर्वसंध्येला उत्साहात पार पडला.
यंदा महाराष्ट्रातील अनेक भाग भीषण दुष्काळाच्या छायेत असल्याने ‘बळीराजाच्या पाठीशी आम्ही आहोत’ हा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला प्रसिद्ध सिनेअभिनेत्री सुहिता थत्ते, दैनिक प्रहारचे संपादक पद्मभूषण देशपांडे, स्थानिक नगरसेविका सई शिर्के, काँग्रेसचे ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष केतन शहा, सामाजिक कार्यकर्ते शरद कदम, नरेंद्र पेडणेकर, श्रद्धा शेट्ये, प्रशांत कोपटे , शिवसेना शाखाप्रमुख गजानन काकडे, डॉ.ओमप्रकाश गजरे, दत्तात्रय बोऱ्हाडे, शहाजी पाटोदेकर, संदेश बालगुडे, विलास जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविकात बोलताना सामाजिक कार्यकर्ते शरद कदम यांनी सांगितले की, “मुंबईत राहणाऱ्या आपल्याला दुष्काळाची झळ अद्याप फारशी जाणवत नसली, तरी येत्या मार्च ते जून या काळात त्याची तीव्रता सर्वांनाच जाणवेल. अशा वेळी बळीराजाच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे ही प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी आहे. समाजातील संवेदना जागृत व्हाव्यात आणि शेतकऱ्यांप्रती कृतज्ञतेची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने दिवाळीच्या पूर्वसंध्येला हा संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.”
यावेळी दैनिक प्रहारचे संपादक पद्मभूषण देशपांडे म्हणाले, “समाजाला दिशा देणारे सण हे केवळ आनंद साजरा करण्यासाठी नसतात,ते समाजाचे भान जागविण्यासाठी असतात. दुष्काळाच्या काळात शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेऊन त्यांच्याविषयी कृतज्ञता आणि सहवेदना निर्माण करणे, हीच दिवाळीच्या प्रकाशाची खरी अर्थपूर्णता आहे.”
प्रसिद्ध सिनेअभिनेत्री सुहिता थत्ते यांनी आपल्या मनोगतात सांगितले, कला ही केवळ मनोरंजनासाठी नसून समाजाला विचार देणारे प्रभावी माध्यम आहे. दुष्काळासारख्या गंभीर प्रश्नावर सांस्कृतिक कार्यक्रमातून समाजाला संवेदनशील करण्याचा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून अशा कार्यक्रमांची आज समाजाला अधिक गरज आहे.
कार्यक्रमात महात्मा जोतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनकार्यावर आधारित विशेष नृत्याविष्कार सादर करण्यात आला. उपस्थितांनी त्याला उत्स्फूर्त दाद देत सामाजिक आशय असलेल्या या ‘दिवाळी संध्या’ उपक्रमाचे कौतुक केले.
आकांक्षा वाघमारे,रूपाली हाटे, सुवर्णमंगल नाईक, वनिता वायकर,प्रगती शिंदे, भारती काजरोळकर, अर्चना साळवे,शैला बोंटे या स्थानिक कलाकारांनी आपली कला सादर करून बळीराजा प्रति आपली संवेदना प्रकट केली.
आज खरच सण कुठे दिसत नाही लोक एकमेकाना न भेटता मोबाइल वर सण साजरा करतात सणाचे महत्त्व सम्पल अस वाटत