एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोर्ले
मुंबई : मालाडमधील मालवणी परिसरातील उत्कर्ष मालवणी मराठी शाळेचे मुख्याध्यापक फिरोज एफ. शेख यांना वांद्रे-वर्ली सी-लिंकवरील एका कर्मचाऱ्याने ‘पाकिस्तानी’ असे संबोधून सार्वजनिकरीत्या अपमानित केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री तसेच एमएमआरडीए प्रशासनाकडे लेखी तक्रार करण्यात आली असून संबंधित घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ७ मार्च २०२६ रोजी सकाळी अंदाजे ११ ते ११.१५ वाजण्याच्या सुमारास फिरोज शेख हे ओला कॅबने वांद्रे-वर्ली सी-लिंक मार्गे प्रवास करत होते. त्यावेळी तेथील एका कर्मचाऱ्याने ओला कॅब चालकासह शेख यांना जाणीवपूर्वक ‘पाकिस्तानी’ असे संबोधत सार्वजनिकरीत्या अपमानित केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
भारताचा नागरिक असलेल्या व्यक्तीला ‘पाकिस्तानी’ असे संबोधणे केवळ अपमानास्पद नसून त्यातून देशद्रोही असल्याचा अर्थ सूचित होतो, जे अत्यंत गंभीर व आक्षेपार्ह असल्याचे शेख यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
सार्वजनिक सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याकडून असे भेदभावपूर्ण व अपमानास्पद वक्तव्य होणे अत्यंत निंदनीय असल्याचे सांगत या घटनेची तात्काळ चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यावर कडक शिस्तभंगात्मक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच घटनेशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज जतन करून तपासासाठी सुरक्षित ठेवण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
या संदर्भात शेख यांनी राज्याचे मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री यांना ई-मेलद्वारे तक्रार पाठवून कारवाईची मागणी केली आहे.