रस्त्यात पालिकेची गाडीच अडकली..

Share

एसएमएस -प्रतिनिधी -सोमा डे.

मुंबई :मालाड पश्चिमेतील मालवणी गेट क्रमांक ७ येथे शहीद अब्दुल हमीद मार्गावर पालिकेकडून खोदकाम करण्यात आलेल्या रस्त्यात कचरा संकलन करणारी पालिकेची गाडी अडकल्याने काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

दोन दिवसांपूर्वी जलगळती थांबवण्यासाठी पालिकेच्या पी उत्तर विभागाच्या जलकामे खात्याकडून सिमेंट काँक्रीटचा रस्ता फोडून भूमिगत जलवाहिन्यांची दुरुस्ती करण्यात आली होती. काम पूर्ण झाल्यानंतर खड्डा भरून वाहन चालकांना सूचना देण्यासाठी लोखंडी बॅरिकेड तसेच लाल-पांढऱ्या प्लास्टिकच्या पट्ट्या लावण्यात आल्या होत्या. मात्र, अज्ञात व्यक्तींनी हे बॅरिकेड हटवल्याने वाहन चालकाला मातीचा अंदाज न आल्यामुळे कचरा संकलन करणारी गाडी रस्त्यात अडकली.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाल्याची माहिती नाही. मात्र, या प्रकारामुळे पालिकेच्या रस्ते विभागाच्या निष्काळजीपणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी वाहन चालक व स्थानिक रहिवाशांनी पालिकेकडे केली आहे.

ही घटना गुरुवारी सकाळी साधारण १० वाजण्याच्या सुमारास घडली. त्या वेळी परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक असल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. जवळपास दोन तासांच्या प्रयत्नांनंतर क्रेनच्या सहाय्याने अडकलेली गाडी बाहेर काढण्यात आली.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *