शासकीय रुग्णालयात ‘MPJAY’ मिशन मोडवर कार्यान्वित करा.

Share

एसएमएस – प्रतिनिधी -उत्कर्ष बोर्ले

मुंबई, दि. ५ : राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपजिल्हा रुग्णालये आणि जिल्हा रुग्णालयांनी महात्मा फुले जनआरोग्य योजनेत(MPJAY ) समाविष्ट असलेले उपचार मिशन मोडवर सुरू करावेत, अशा सूचना राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या.
मुंबईतील “सुरुची” या शासकीय निवासस्थानी महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या अधिकाऱ्यांसह आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आरोग्यमंत्री आबिटकर म्हणाले की, सरकारी दवाखान्यांच्या माध्यमातून जनआरोग्य योजना प्रभावीपणे राबवल्या गेल्या पाहिजेत. त्यामुळे शासनाचा निधी थेट सरकारी रुग्णालयांना मिळेल. या निधीमुळे सरकारी रुग्णालयांचे सक्षमीकरण होईल तसेच डॉक्टरांनाही अधिक चांगला प्रोत्साहन भत्ता मिळू शकेल.
यापूर्वी जनआरोग्य योजनेशी संलग्नित झालेल्या रुग्णालयांनी गेल्या सहा महिन्यांतील प्रगतीचा अहवाल सादर करण्याच्या सूचनाही आरोग्यमंत्र्यांनी दिल्या.
न्यूरो, कॅन्सर आणि ऑर्थो (अस्थिरोग) यांसारख्या गंभीर आजारांच्या उपचारांसाठी वाढीव पॅकेज देण्याबाबत तसेच PET-Scan सारख्या अत्याधुनिक सुविधांसाठी सामंजस्य करार (MoU) करण्याच्या सूचनाही बैठकीत देण्यात आल्या.
महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या जिल्हा समन्वयकांनी अधिक सक्रिय होऊन काम करावे. स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार तसेच जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी सातत्याने संपर्क ठेवून योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी, असेही निर्देश देण्यात आले.
रुग्णालयांना मिळणाऱ्या कॉर्पस फंडचा विनियोग रुग्णालयातील पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी, औषध खरेदीसाठी आणि डॉक्टरांच्या प्रशिक्षणासाठी करण्यात यावा. यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करून एसओपी तयार करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. शासकीय रुग्णालयांनी स्वतःच्या पायावर उभे राहून दर्जेदार आरोग्य सेवा देणे अपेक्षित असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
तसेच महात्मा फुले जनआरोग्य योजनेची व्यापक प्रसिद्धी करावी आणि योजनेची माहिती देणारा टोल फ्री नंबर सर्वत्र प्रदर्शित करावा, अशा सूचनाही बैठकीत देण्यात आल्या.
बैठकीस महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अण्णासाहेब चव्हाण, आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, संचालक पुणे डॉ. विजय कंदेवाड यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


Share

2 thoughts on “शासकीय रुग्णालयात ‘MPJAY’ मिशन मोडवर कार्यान्वित करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *