स्वा.सैनिक मामासाहेब कुलकर्णी चौकाजवळ गाळ!!

Share

एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोरले

मुंबई : विलेपार्ले पूर्व येथील शहाजी राजे भोसले मार्गावरील स्वातंत्र्य सैनिक दामोदर बळवंत मामासाहेब कुलकर्णी चौकाजवळ गटारातील गाळ व मातीचा मोठा ढिगारा टाकून ठेवण्यात आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. या ढिगाऱ्यामुळे चौकाचे तसेच स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मारकाचे सौंदर्य मलीन होत असल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

स्थानिक नागरिकांनी सांगितले की, गटार साफसफाईनंतर काढण्यात आलेला गाळ अनेक दिवसांपासून तसाच रस्त्याच्या कडेला व पदपथावर पडून आहे. याबाबत महापालिका कर्मचाऱ्यांकडे तोंडी तक्रार करूनही वेळेत गाळ उचलण्यात आलेला नाही. त्यामुळे माती व गाळ पदपथावर पसरला असून नागरिकांना चालण्यासाठी जागाच उरलेली नाही.

विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला व शालेय विद्यार्थ्यांना ये-जा करताना मोठी अडचण निर्माण होत आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर हा गाळ तातडीने हटवावा तसेच परिसराची स्वच्छता करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *