एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोर्ले
कांदिवली पश्चिमेतील चारकोप गाव परिसरात एका कन्स्ट्रक्शन साईटवर घुसखोरी करत काही जणांनी मारहाण, तोडफोड आणि 10 लाख रुपयांची खंडणी मागितल्याची धक्कादायक घटना 13 फेब्रुवारी रोजी घडली. या प्रकरणी किशोर दळवी, विश्वास मोरे,अशोक मंडल, पांडुरंग देसाई,राजेंद्र धनेकर व इतर अनोळखी इस्मान विरोधात चारकोप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सर्व्हे नं. 42, सेक्टर 8, बंगला नं. 24 येथे असलेल्या जयस्वाल कन्स्ट्रक्शनच्या गोदामात सुपरव्हायझर म्हणून कार्यरत असलेले अर्जुन रामप्रसाद (वय 55) हे सकाळी नियमित कामावर हजर होते. दुपारी सुमारे 12.30 वाजताच्या सुमारास किशोर दळवी, विश्वास मोरे, अशोक मंडल, पांडुरंग देसाई, राजेंद्र धनेकर यांच्यासह 10 ते 12 अनोळखी इसमांनी बंद असलेल्या लोखंडी गेटजवळ येऊन सुरक्षारक्षकास गेट उघडण्यास सांगितले.सुरक्षारक्षकाने नकार दिल्यानंतर एका इसमाने लोखंडी रॉडने गेटची कडी तोडून सर्वांनी जबरदस्ती आत प्रवेश केला. त्यानंतर 5 ते 6 जणांनी सुरक्षारक्षक धरनीधर मिश्रा याला मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. हा प्रकार थांबविण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुपरव्हायझर अर्जुन रामप्रसाद यांनाही मारहाण करण्यात आली.
दरम्यान, कामगार धुन्नु मोहम्मद हा मोबाईलवर घटनेचे चित्रीकरण करत असताना त्याचा मोबाईल हिसकावून त्यालाही मारहाण करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच इंजिनिअर अनुप मोर्या घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी संबंधितांनी “सहा महिन्यांपासून पैसे मागत आहे, 10 लाख रुपये द्या; अन्यथा कारखाना बंद करू,” अशी धमकी दिल्याचे सांगण्यात आले. झटापटीदरम्यान अनुप मोर्या यांच्या गळ्यातील सोन्याची चैन हरवल्याचीही तक्रार आहे.
याच वेळी आरोपींनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड करून डीव्हीआर घेऊन गेल्याचे तसेच कामगारांचे मोबाईल नेऊन त्यातील व्हिडिओ डिलीट केल्याचे उघड झाले आहे. संध्याकाळी एक अनोळखी व्यक्ती मोबाईल परत करून गेली; मात्र त्यातील सर्व चित्रीकरण हटविण्यात आले होते.
या घटनेनंतर संबंधितांविरुद्ध मारहाण, खंडणी, तोडफोड व चोरीप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
चारकोप परिसरातील या घटनेमुळे स्थानिक व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Bad