
एसएमएस -प्रतिनिधी -वैशाली महाडिक
मुंबई : गोरेगाव (प.) येथील मराठी माध्यमाची प्रसिद्ध आणि शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्वात जुन्या शाळांपैकी एक असलेल्या आदर्श विद्यालयात मार्च २०२६ च्या एसएससी परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा माजी विद्यार्थ्यांतर्फे गौरव सोहळा उत्साहात पार पडला.
यंदाच्या शालान्त परीक्षेत प्रत्येक विषयात सर्वाधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना रोख शिष्यवृत्ती देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये कु. प्रियांका ज्ञानदेव भोसले हिने विज्ञान, मराठी आणि संस्कृत विषयांत, कु. निशा अशोक साळुंखे हिने इंग्रजी व समाजशास्त्र विषयांत, तर कु. दर्शनी गणेश वैराग्य हिने गणित विषयात सर्वोच्च गुण मिळवत विशेष गौरव प्राप्त केला.
यावर्षी इयत्ता दहावीच्या अ आणि ब तुकडीतील एकूण ५० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. विशेष म्हणजे, आदर्श विद्यालयाने दरवर्षीप्रमाणे यंदाही शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखत उल्लेखनीय यश संपादन केले.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून १९८६ च्या बॅचचे माजी विद्यार्थी दिनेश लोहार उपस्थित होते. त्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला मुख्याध्यापिका वर्षा शोभने, शिक्षकवृंद, माजी विद्यार्थी तसेच यंदाच्या शालान्त परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना मान्यवरांनी सातत्यपूर्ण परिश्रम, जिद्द आणि गुणवत्तेच्या बळावर भविष्यातही यशाची नवी शिखरे गाठण्याचा संदेश दिला. माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेशी जपलेले नाते आणि गुणवंत विद्यार्थ्यांना दिलेले प्रोत्साहन हे इतरांसाठी प्रेरणादायी असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.