
एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोर्ले
मुंबई : मालाड पश्चिमेतील सोमवारी बाजार परिसरातील पालिकेची मराठी माध्यमाची एकमेव कन्या शाळा पाडून जवळपास वर्ष उलटले असले तरी अद्याप त्या ठिकाणी नव्या इमारतीचे बांधकाम सुरू झालेले नाही. त्यामुळे स्थानिक रहिवासी, विद्यार्थीनी व त्यांच्या पालकांमध्ये तीव्र नाराजी आणि चिंता व्यक्त होत आहे.
मालाड परिसरातील इंग्रजांच्या काळातील सुमारे २०० वर्षे जुनी ही ऐतिहासिक वास्तू मुलींसाठीच्या विशेष मराठी कन्या शाळा म्हणून ओळखली जात होती. दुरुस्ती व पुनर्बांधणीच्या नावाखाली ही शाळा पाडण्यात आली. मात्र इतका काळ लोटूनही त्या ठिकाणी एक वीटही रचली गेली नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
या संदर्भात मुंबई काँग्रेसचे महासचिव संतोष चिकणे यांनी पालिका आयुक्त तसेच शिक्षण विभागाला लेखी पत्र देऊन शाळेच्या कामाबाबत माहिती विचारली आहे. मात्र अद्याप त्यांना कोणतेही समाधानकारक उत्तर मिळालेले नाही.

पालिकेच्या स्कुल इन्फ्राष्ट्रक्चर सेल (SIC) च्या माध्यमातून शाळेची इमारत पूर्णपणे पाडण्यात आली होती. मात्र त्या जागेवर सध्या कोणतेही बांधकाम सुरू नसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये पालिकेच्या कामकाजाबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
पूर्वी समाजातील परिस्थिती लक्षात घेऊन मुलींना शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून पालिकेने विशेष कन्या शाळा सुरू केली होती. परंतु कालांतराने शाळेची नियमित दुरुस्ती न झाल्यामुळे इमारत जीर्ण झाली आणि अखेर ती पाडण्यात आली. सध्या या शाळेतील विद्यार्थिनींना मालाड एस.व्ही. रोड येथील नेमानी पालिका शाळेत तात्पुरती सोय करण्यात आली आहे.
मात्र वर्ष उलटूनही नव्या शाळेच्या इमारतीचे काम सुरू न झाल्याने पालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
Ohh very bad.=