नवजात बाळांच्या श्रवण तपासणीसाठी व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉट गाईड सुरू..

Share

एसएमएस -प्रतिनिधी -वैशाली महाडिक

मुंबई : नवजात बाळांमध्ये ऐकण्याची समस्या लवकर ओळखण्यासाठी आणि पालकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी विप्ला फाउंडेशन आणि अवाश्य फाउंडेशन यांच्या सहकार्याने एक अभिनव व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉट गाईड सुरू करण्यात आला आहे. या चॅटबॉटद्वारे नवजात बाळांच्या श्रवण तपासणीबाबत आवश्यक माहिती, तपासणीचे महत्त्व, तपासणी कशी केली जाते याचा व्हिडिओ तसेच तपासणी कुठे केली जाते याबाबतची माहिती पालकांना सहज उपलब्ध होणार आहे.
विप्ला फाउंडेशनच्या ‘ध्वनी अर्ली इंटरव्हेन्शन सेंटर’ मार्फत मुंबईतील ५ बीएमसी रुग्णालयांमध्ये नवजात बाळांची मोफत श्रवण तपासणी केली जात आहे. ध्वनी केंद्रात अनुभवी व प्रशिक्षित तज्ञांची टीम कार्यरत असून मुंबई आणि पुणे (चिंचवड) येथे अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. येथे श्रवण तपासणी, ऑडिटरी व्हर्बल थेरपी (Auditory Verbal Therapy), शाळेसाठी तयारी (School Readiness) कार्यक्रम, मोफत हिअरिंग एड्स, तसेच कोक्लिअर इम्प्लांटसंबंधी मार्गदर्शन अशा विविध सेवा उपलब्ध आहेत.
याशिवाय, ‘डायल फॉर ध्वनी’ मिस्ड कॉल सेवा २०२२ पासून सुरू असून श्रवणदोषासंबंधी कोणतीही माहिती किंवा मार्गदर्शन हवे असल्यास नागरिक या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकतात. आता याच उपक्रमाचा विस्तार म्हणून नवजात श्रवण तपासणीबाबत अधिक जागरूकता निर्माण करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉट गाईड सुरू करण्यात आला आहे.
पालकांनी 020 48555455 या क्रमांकावर कॉल केल्यास त्यांना व्हॉट्सअ‍ॅपवर मार्गदर्शक संदेश मिळेल. या चॅटबॉटद्वारे पालकांना सोप्या भाषेत नवजात श्रवण तपासणीबाबत संपूर्ण माहिती मिळेल.
भारतामध्ये नवजात बाळांची श्रवण तपासणी सर्वत्र नियमितपणे केली जात नाही. त्यामुळे अनेक मुलांमध्ये ऐकण्याची समस्या उशिरा लक्षात येते. ऐकण्याची अडचण ही अनेकदा दिसून न येणारी ‘हिडन डिसॅबिलिटी’ असल्यामुळे तिचे लवकर निदान करणे अत्यंत आवश्यक आहे. जन्मानंतर लवकर तपासणी केल्यास योग्य वेळी उपचार व पुनर्वसन करून मुलांच्या बोलण्याच्या व भाषाविकासाला मदत करता येते.
या उपक्रमामुळे अधिकाधिक पालकांपर्यंत माहिती पोहोचेल आणि नवजात बाळांच्या श्रवण तपासणीबाबत जागरूकता वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. पालकांनी या सुविधेचा लाभ घेऊन आपल्या बाळाच्या आरोग्याबाबत सजग राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


Share

One thought on “नवजात बाळांच्या श्रवण तपासणीसाठी व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉट गाईड सुरू..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *