‘मिशन पेडेस्ट्रियन फर्स्ट’लाच अधिकारी खीळ घालत आहेत. तिवाना.

Share

एसएमएस -प्रतिनिधी -सोमा डे.

मुंबई :नगरसेवक तेजिंदर सिंग तिवाना यांचा प्रभाग समितीत जोरदार हल्लाबोल.आयुक्तांच्या महत्त्वाकांक्षी ‘मिशन पेडेस्ट्रियन फर्स्ट’ला यशस्वी होऊ नये म्हणूनच काही विभाग स्तरावरील अधिकारी रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत का? पदपथावरील अतिक्रमण हटवले, पादचारी मुक्त झाले… आणि काही दिवसांतच पुन्हा तेच फेरीवाले, तेच अतिक्रमण! ही नाट्यमय पुनरावृत्ती पाहून नगरसेवक तेजिंदर सिंग तिवाना यांनी आज पूर्व आणि पश्चिम प्रभाग समितीच्या बैठकीत प्रशासनावर तुटून पडले.

स्थायी समिती सदस्य तथा नगरसेवक तिवाना यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले, “आयुक्तांच्या मिशन पेडेस्ट्रियन फर्स्टला असफल करण्याचे आणि तिला बदनाम करण्याचे काम आपलेच अधिकारी करत आहेत. ही मोहीम जनतेने स्वागत केलेली आहे, पण प्रशासकीय पातळीवरच तिला अडथळे निर्माण केले जात आहेत.”

आयुक्त अश्विनी भिडे यांनी प्रत्येक प्रशासकीय वॉर्डमध्ये २० रस्ते निश्चित करून पादचाऱ्यांना विनाअडथळा चालता यावे यासाठी ही मोहीम हाती घेतली होती. कारवाईही सुरू झाली. मात्र पी पश्चिम प्रभागातील उदाहरण देत तिवाना यांनी खडे बोल सुनावले. ज्या रस्त्यांवर फुटपाथवरील अतिक्रमण हटवले गेले, तिथे पुन्हा अतिक्रमण फोफावले आहे. पादचारी पुन्हा रस्त्यावर उतरले आहेत. “अतिक्रमण हटवल्यानंतरही पादचाऱ्यांना त्याचा वापर करता येत नाही. उलट पुन्हा तिथे अतिक्रमण झाले आहे. कोणत्या रस्त्यांवर कारवाई झाली आणि नंतर पुन्हा कसे अतिक्रमण झाले, याची यादी द्या,” अशी मागणी त्यांनी केली.

तिवाना यांचा सर्वात आक्रमक मुद्दा होता – “पैसे घेऊन फेरीवाले पुन्हा बसविले जातात का? सत्ता बदलली तरी अधिकारी-कर्मचारी वर्गाची मानसिकता बदललेली नाही!”  

आयुक्तांच्या स्वप्नाला प्रशासकीय पातळीवरच खीळ घालण्याचा हा प्रकार आहे का, असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केला. बैठकीत त्यांनी प्रशासनाकडून स्पष्टीकरण आणि ठोस कारवाईची मागणी केली.  

पादचारी सुरक्षिततेच्या मोहिमेलाच अधिकारी अडथळा ठरत असतील तर जनतेचे काय होणार? तिवाना यांच्या या हल्लाबोलानंतर प्रशासन आता काय उत्तर देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


Share

One thought on “‘मिशन पेडेस्ट्रियन फर्स्ट’लाच अधिकारी खीळ घालत आहेत. तिवाना.”

  1. कोण फसवणूक करत आहे कोण भ्रष्ट आहे हे कस ठरवणार कोण पैसे घेतो तर कोण महणतो माझा माणुस आहे हे सर्व होतच राहणार आपण हे पहात राहयाच

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *