
एसएमएस -प्रतिनिधी -वैशाली महाडिक
पुणे : समाजातील बदलत्या परिस्थितीत केवळ टीका करून उपयोग नाही, तर सक्रिय सहभागातूनच परिवर्तन घडवावे लागते. यासाठी राष्ट्र सेवा दलासारख्या संघटनांनी अधिक सक्रिय होणे अत्यंत आवश्यक आहे, असे मत सिने दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी व्यक्त केले.
राष्ट्र सेवा दलातर्फे आयोजित क्रियाशील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी संपादक संजय आवटे, माजी विश्वस्त प्रकाश परांजपे, झेलम परांजपे, माजी अध्यक्ष प्रकाश कांबळे, महाराष्ट्राचे माजी कार्याध्यक्ष राजा अवसक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवराज मोहिते होते.
गेल्या काही वर्षांत न्यायव्यवस्था, पत्रकारिता आणि सांस्कृतिक क्षेत्राने आपली जबाबदारी अपेक्षेप्रमाणे पार पाडलेली नाही, अशी खंत व्यक्त करत गोस्वामी म्हणाले, “अनेक कलाकारांच्या मनात अस्वस्थता असली तरी ते मोकळेपणाने व्यक्त होऊ शकत नाहीत. त्यामुळे समाजात भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.”
अंधश्रद्धा आणि चुकीच्या माहितीविरोधात सातत्याने जनजागृती करण्याची गरज अधोरेखित करत त्यांनी कार्यकर्त्यांना केवळ घोषणांपुरते मर्यादित न राहता ठोस कार्यक्रम राबविण्याचे आवाहन केले. “प्रत्येक कार्यकर्त्याकडे क्षमता असते; मात्र त्याला योग्य दिशा आणि नियोजनाची गरज असते,” असे ते म्हणाले.
विविध विचारांच्या लोकांशी संवाद साधत त्यांना विचार करण्यास प्रवृत्त करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, “आजच्या काळात सांस्कृतिक माध्यमे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रभावीपणे विचार पोहोचवता येतो,” असेही त्यांनी नमूद केले.
नागरिकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी हे ‘मालक’ नसून ‘विश्वस्त’ आहेत. त्यामुळे त्यांना प्रश्न विचारणे ही लोकशाहीची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अशा कार्यक्रमांमधून व्यापक सामाजिक चळवळ उभी राहील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
संपादक संजय आवटे म्हणाले, “राष्ट्र सेवा दल ही आजच्या काळाची गरज आहे. नव्या पिढीला बोलत करणे आवश्यक आहे. भारताची कल्पना पुसून टाकण्याचे प्रयत्न सुरू असताना ‘भारत’ काय आहे हे सतत सांगणे गरजेचे आहे. जगातील क्रांती तरुणांकडूनच घडतात. मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र काम करावे.”
मेळाव्याच्या उद्घाटन सत्राचे प्रास्ताविक राजा अवसक यांनी केले. सूत्रसंचालन मनीषा पाटील यांनी केले, तर आभार अश्विनी सातव-डोके यांनी मानले. या कार्यक्रमाचे आयोजन दीपाली आपटे, संजय गायकवाड, दत्ता पाकिरे, संदेश दिवेकर, प्रकाश डोंबाळे, प्रकाश कदम, तुकाराम अडसूळ आदी कार्यकर्त्यांनी केले.