दुबई कनेक्शनचा धाक दाखवत दीड कोटींची खंडणी..

Share

एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोर्ले

मुंबई : बोरीवली पोलिसांनी दुबईतील ‘भाई’ लोकांचा धाक दाखवत दीड कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी फॅशन डिझायनरसह तिघांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.

बोरीवली पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीनुसार, नवकार बिल्ड्स अँड डेव्हलपर्सचे समीर गणेश भुबे हे अंडमायर रिवाइव्ह बिल्डर अँड डेव्हलपर्स या कंपनीमार्फत अंधेरी पूर्व येथील मापखान नगर परिसरात ‘रॉयलग्रीन’ नावाचा एसआरए प्रकल्प राबवत आहेत. या प्रकल्पात दुबईत वास्तव्यास असलेल्या अकील मुखी आणि त्यांची पत्नी फजिला मुखी यांनी एजंटमार्फत ७२ लाख रुपयांत ११व्या मजल्यावरील फ्लॅट बुक केला होता. मात्र, त्यापैकी सुमारे २५ लाख रुपयांची रक्कम अद्याप थकीत असल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.

दरम्यान, जानेवारी २०२५ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत संबंधित बिल्डरकडून अकील मुखी व त्यांच्या पत्नीला भाडे म्हणून सुमारे ४.२० लाख रुपये देण्यात आल्याची नोंद एफआयआरमध्ये आहे. त्यानंतर अकील मुखी, फजिला मुखी आणि फॅशन डिझायनर रियाज गंगजी यांनी दुबईतील गुंडांशी संबंध असल्याचा धाक दाखवत दीड कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. पैसे न दिल्यास भागीदार व त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

या प्रकरणी बोरीवली पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ३०८(४), ३५६ व ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदवला असून पोलीस उपनिरीक्षक समीर पाटील अधिक तपास करत आहेत.


Share

2 thoughts on “दुबई कनेक्शनचा धाक दाखवत दीड कोटींची खंडणी..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *