राज्यात महिनाभरात१४ भोंदू बाबांवर गुन्हे दाखल..

Share

प्रतिनिधी :वैशाली महाडिक.

मुंबई : राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या भोंदू अशोक खरात प्रकरणानंतर अवघ्या एका महिन्यात महाराष्ट्रात १४ भोंदू बाबांविरोधात गुन्हे दाखल झाल्याची माहिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) दिली आहे. या प्रकरणांमध्ये महिलांचे लैंगिक शोषण, आर्थिक फसवणूक आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली अमानुष प्रकार झाल्याचे समोर आले आहे.
शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या दीर्घ संघर्षानंतर २०१३ मध्ये महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायदा अस्तित्वात आला. असा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले. मात्र, या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात सरकार अपयशी ठरत असल्याची टीका अंनिसकडून करण्यात आली आहे.
अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे, बुवाबाजी संघर्ष विभागाच्या कार्यवाह ॲड. रंजना गवांदे आणि सहकार्यवाह विष्णू लोणारे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले की, “अशोक खरात प्रकरणानंतर अनेक पीडित महिलांना पुढे येण्याची हिंमत मिळाली आहे. न्याय मिळण्याची अपेक्षाही निर्माण झाली आहे. काही ठिकाणी नागरिकांनी स्वतःहून तक्रारी दिल्या, तर काही ठिकाणी अंनिसच्या प्रयत्नातून गुन्हे दाखल झाले.”
ग्रामीण आणि शहरी भागातील महिला व पुरुषांची अंधश्रद्धेच्या नावाखाली फसवणूक होत असल्याचे या घटनांमधून स्पष्ट झाले आहे. विशेषतः महिलांच्या शारीरिक शोषणासोबत आर्थिक लूटही मोठ्या प्रमाणात झाल्याचे समोर आले आहे. सामाजिक प्रतिष्ठा आणि भीतीमुळे अनेक पीडित पुढे येण्यास घाबरत असल्याने त्यांनी न घाबरता तक्रार करावी, असे आवाहन अंनिसने केले आहे.
गेल्या महिनाभरात दाखल झालेले प्रमुख गुन्हे पुढीलप्रमाणे :
१) अशोक कुमार खरात – नाशिक
२) राजेंद्र गडगे उर्फ गडगेबाबा – संगमनेर, अहिल्यानगर
३) चेतन सुनील माळी – मूर्तिजापूर, अकोला
४) पंकज देवराम घोलप – येडगाव, पुणे
५) मनोहर मामा भोसले – कुरुडवाडी, सोलापूर
६) नाना बर्डे – आळेफाटा, पुणे
७) ऋषिकेश वैद्य – वसई, मुंबई परिसर
८) अल्ताफ रईस खान – मालाड, मुंबई
९) रिधम पांचाळ – मालाड, मुंबई
१०) गणेश शिंदे – श्रीरामपूर, अहिल्यानगर
११) अर्जुन चव्हाण उर्फ टनटन बाबा – नवी मुंबई
१२) विठोबा वाल्मीक जाट – सातपूर, नाशिक
१३) किसन तळपे – मंदोशी, खेड
१४) महेशगिरी उर्फ महेश काकडे – निफाड, नाशिक
या घटनांमुळे पुरोगामी महाराष्ट्रात अंधश्रद्धेचे वाढते जाळे आणि त्यातून होणारे शोषण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *