स्वराज्याच्या वैभवाचा उत्सव! दुर्गराज रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याची भव्य पर्वणी

Share

एसएमएस -निसार अली सय्यद.

मुंबई :अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे दुर्गराज रायगडावर ५ आणि ६ जून २०२६ रोजी भव्य शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ऐतिहासिक स्मृती जपण्यासाठी दरवर्षी साजरा होणारा हा सोहळा यंदा अधिक दिमाखात पार पडणार असून, समितीचे मार्गदर्शक संभाजीराजे छत्रपती आणि युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
६ जून १६७४ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक रायगडावर झाला होता. या दिवसाला “भारताचा पहिला स्वातंत्र्यदिन” म्हणून गौरविले जाते. याच ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी रायगडावर हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत राज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो.
यंदाच्या सोहळ्यात ‘धार तलवारीची, युद्धकला महाराष्ट्राची’, ‘जागर शिवशाहिरांचा.. स्वराज्याच्या इतिहासाचा’ आणि ‘सोहळा पालखीचा, स्वराज्याच्या ऐक्याचा’ हे मुख्य आकर्षण ठरणार आहेत.
५ जून रोजी राजमाता जिजाऊ साहेब यांच्या समाधीस्थळी अभिवादन करून सोहळ्याची सुरुवात होईल. त्यानंतर युवराज संभाजीराजे छत्रपती व शहाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली शिवभक्तांसह पायी गड चढाई, गडपूजन, युद्धकलेची प्रात्यक्षिके, ढोल-लेझीम सादरीकरण, शिवशाहीरांचा जागर, गोंधळ, कीर्तन व भजन असे विविध कार्यक्रम होणार आहेत.

६ जून रोजी ध्वजपूजन व ध्वजारोहणानंतर शाहिरी कार्यक्रम, शिवछत्रपती महाराजांच्या पालखीचे आगमन, उत्सवमूर्तीचा अभिषेक, सुवर्ण मुद्रांचा अभिषेक, युवराज संभाजीराजे छत्रपती यांचे शिवभक्तांना मार्गदर्शन आणि भव्य पालखी सोहळा पार पडणार आहे. तसेच वारकरी संप्रदायाला पंढरपूर वारीसाठी मानाचा ध्वज प्रदान करण्यात येणार असून, अखेरीस शिवछत्रपती महाराजांच्या समाधीला अभिवादन करून सोहळ्याची सांगता होईल.
इतिहासप्रेमी, शिवभक्त आणि महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेचे साक्षीदार होऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी या ऐतिहासिक सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *